चंदीगढ- हरियाणामध्ये सीबीएसई टॉपरवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. रेवाडी जिल्ह्यात १९ वर्षीय तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तरुणी बेशुद्द होईपर्यंत तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. नंतर तिला बस स्टॅण्डवर सोडून आरोपींनी पळ काढला.
पीडित तरुणी कोचिंगसाठी जात असताना ही घटना घडली. तरुणी कोचिंगसाठी जात असताना कारमधून आलेल्या आरोपींनी तिचे अपहरण केले आणि एका शेतात नेऊन सामूहिक बलात्कार केला. काही आरोपी आधीच शेतात थांबले होते. त्यांनीही तरुणीवर बलात्कार केला. सर्व आरोपी आपल्याच गावातील असल्याचं पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले आहे.
पीडित तरुणीने घरी पोहोचल्यानंतर कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. आरोपींनी धमकावल्यानंतर आपण एका पोलीस ठाण्यापासून दुसऱ्या पोलीस ठाण्यापर्यंत तक्रार दाखल होईल या अपेक्षेने धावत होतो असं त्यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी मात्र आरोप फेटाळून लावत झीरो एफआयआर दाखल करुन घेतला असल्याचं सांगत आहे.
पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे की, तरुणी सीबीएसईमध्ये २०१५ रोजी हरियाणा विभागात पहिली आली होती. २६ जानेवारी २०१६ रोजी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला होता. सध्या ती पुढील शिक्षण घेत होती.