सीबीएसई दहावी, बारावी परीक्षा 5 मार्चपासून!

0

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी-बारावीच्या मुख्य लेखी परीक्षा 5 मार्चपासून सुरू होणार आहेत. गुरुवारी सीबीएसईकडून या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता विद्यार्थ्यांची तयारी सुरु झाली आहे.

17 लाख विद्यार्थी देणार परीक्षा
सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा 5 मार्चला सुरु होतील, तसेच या परीक्षा 5 एप्रिलपर्यंत चालतील. या परीक्षेत एकूण 95 हुन अधिक विषयांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यात मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड, तामिळ, तेलुगू आदी भाषांसह फ्रेंच, जर्मन आदी भाषा विषयांचादेखील समावेश आहे. या परीक्षेला देशभरातून सुमारे 17 लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार असल्याची माहिती सीबीएसईतर्फे देण्यात आली आहे.

बारावी परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर
सीबीएसईच्या बारावीची परीक्षा ही 5 मार्चलाच सुरू होणार असून, ती 12 एप्रिलपर्यंत चालेल. यात 169 विषयांच्या परीक्षा होतील. यासंदर्भात मंडळाने आपल्या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध करुन दिली असून, प्रत्येक परीक्षा केंद्रालाही त्यासाठीची माहिती देण्यात आली असल्याचे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.