सीबीएसई : फेरपरीक्षेतून महाराष्ट्रातील विद्यार्थी सुटले!

0

बारावी अर्थशास्त्राचा पेपर 25 एप्रिलला, दहावी गणितबाबत दोन आठवड्यात निर्णय
दिल्ली आणि हरियाणातच फेरपरीक्षा घेणार : शिक्षण सचिवांची माहिती

नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सीबीएसईच्या फेरपरीक्षेला आपले पाल्य बसवू नका, असे आवाहन करताच राजधानी नवी दिल्लीत वेगवान हालचाली घडल्या. पेपर फुटल्याने अडचणीत आलेल्या केंद्रीय शिक्षण खात्याने तातडीने ही फेरपरीक्षा केवळ दिल्ली व हरियाणा राज्यातच घेण्याची घोषणा केली. इयत्ता बारावीच्या अर्थशास्त्राचा पेपर 25 एप्रिलरोजी होणार असून, इयत्ता दहावीच्या गणिताच्या पेपरच्या तारखेची घोषणा दोन आठवड्यात केली जाईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण सचिव अनिल स्वरुप यांनी दिली. याबाबतचा अधिकृत निर्णय पंधरवडाभरात घेतला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. सीबीएसईच्या पेपरफुटीनंतर देशभरात संताप व्यक्त होत असून, आता ही फेरपरीक्षा केवळ दिल्ली व हरियाणातच होत असल्याने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका झाली आहे, त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या पालकांचा जीव भांड्यात पडला आहे.

सीबीएसई पेपर फुटीचा तपास सुरु; गूगलकडूनही माहिती मागविली, अधिकार्‍यांचीही कसून चौकशी
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या पेपरफुटीप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून कसून चौकशी सुरु केली आहे. सीबीएसईच्या अध्यक्षांना या पेपरफुटीची अगोदरच पूर्वकल्पना देव नारायण नावाच्या वक्तीने ई-मेलद्वारे दिली होती. परंतु, या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची बाबत तपासात उघड झाली आहे. परिणामी, पोलिसांनी गूगलकडूनही माहिती मागविली असून, अध्यक्षांसह इतर अधिकार्‍यांची कसून चौकशी सुरु केली आहे. दहावी व बारावीचे पेपर फुटल्याने लाखो विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयावर टीका होत आहे. सरकारच्या आदेशावरून पोलिसांनी सीबीएसईच्या अध्यक्षांसह परीक्षा नियंत्रकांची तब्बल चार तास कसून चौकशी केली. तसेच, काही कोचिंग सेंटरसह 45 पेक्षाअधिक विद्यार्थ्यांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दहावीच्या गणिताचा आणि बारावीच्या अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा घेण्याचा आदेश देणार्‍या सीबीएसईच्या अध्यक्षा अनिता करवाल यांचीही पोलिसांनी कसून चौकशी केली. या पेपरफुटीमुळे सीबीएसईच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, केंद्र सरकारवरदेखील टीका होत आहे. फुटलेला पेपर अंदाजे एक हजार विद्यार्थ्यांकडे पोहोचला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दिवसभरात काय झाले?
– सीबीएसई अध्यक्षांना ई-मेलद्वारे तक्रार प्राप्त झाल्याचे उघड
– या ई-मेलद्वारे फुटलेल्या पेपरचे तब्बल 12 फोटो पाठविल्याचेही उघड
– या तक्रारीच्या आधारेच गूगलकडून पोलिसांनी माहिती मागविली
– सीबीएसईच्या परीक्षा नियंत्रकांची तब्बल चार तास कसून चौकशी
– गुन्हे शाखेकडून कोचिंग सेंटरवर छापे, विद्यार्थ्यांचीही चौकशी
– दोन डझन मोबाईल केले जप्त, कुणालाही न सोडण्याचा केंद्राचा आदेश

राज ठाकरे म्हणतात, पुनर्परीक्षेवर बहिष्कार टाका!
सीबीएसई पेपरफुटीच्या वादात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही उडी घेतली होती. दोन विषयांची पुनर्परीक्षा घेण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला राज यांनी कडाडून विरोध दर्शविला. कोणत्याही परिस्थितीत पालकांनी विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसवू नये, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. दिल्लीसह ठिकठिकाणी विद्यार्थ्यांची निदर्शने सुरु असून, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरावर दिल्लीत विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेनेही या मोर्चात सहभाग घेतला असताना, आता मनसेनेदेखील या वादात उडी घेतल्याने वातावरण चांगलेच तापले होते. सीबीएसई परीक्षेचे पेपर फुटण्याला सरकारचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. सरकारला प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखता येत नसेल तर त्यात विद्यार्थ्यांचा काय दोष? त्यांनी का पुन्हा त्या विषयाच्या परीक्षेला बयसायचे? स्वतःची चूक सुधारायची सोडून विद्यार्थ्यांना कसल्या परीक्षा द्यायला लावता, असे सवाल राज ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे केंद्रीय शिक्षण खात्याने तातडीने हालचाली करत महाराष्ट्रात फेरपरीक्षा न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.