सीबीडीतील बहुद्देशीय केंद्राची अवस्था बिकट

0

नेरुळ । सीबीडी सेक्टर 8 येथील महानगरपालिकेच्या ‘मदर तेरेसा बहुद्देशीय सुविधा केंद्रा’च्या इमारतीमधील अंतर्गत व बाह्य भागाची भागाची दुरावस्था झाली आहे. इमारतीची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सीबीडी बेलापूर भाजपा महिला मोर्चाच्या दिपाली घोलप यांनी आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.सीबीडी सेक्टर – 8 आर्टिस्ट व्हिलेज मधील महानगरपालिकेचे ‘मदर तेरेसा बहुद्देशीय सुविधा केंद्रा’ आहे.

पालिकेने विभागांतर्गत बहुद्देशीय केंद्र बांधलेल्या आहेत. यात सांस्कृतिक, क्रीडा व कला असे विविध कार्यक्रम विभागातील नागरिकांना साजरे करता यावेत अशी व्यवस्था पालिकेकडून करण्यात आली आहे. मात्र सीबीडी येथील इमारत पाहता इमारतीमधील अंतर्गत भागाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. केंद्रातील भिंतींचे प्लास्टर व खोल्यांच्या आतील भागातील छताच्या भागातील प्लास्टर खराब झाले असून, काही प्रमाणात त्याची पडझडही झालेली आहे. खोल्यांना सुरक्षित करणार्‍या दरवाजांचे कडी-कोयंडे तुटलेले असून, पायर्‍यांलगतच्या भिंतींना तडे जाऊन प्लास्टरही पडलेले आहे. पहिल्या माळ्यावरील खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत. तसेच, इमारतीची ओळख दर्शविणार्‍या नामफलकचा रंगही फिकट होऊन पुसला गेला आहे.

पालिका विभागाचे या इमारतीकडे दुर्लक्ष
एकंदर इमारतीकडे पाहिल्यावर लक्षात येते.त्यातच पालिका स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सहभागी झाली आहे. त्यानुसार पालिका सामाजिक,नागरी व पालिका मुख्यालय,विभाग अंतर्गत स्वछता मोहीम युद्धपातळीवर राबवत आहे. तर खुद्द पालिकायुक्त पाहणी दौरे करत आहेत.स्पर्धेत पालिका प्रथम क्रमांकावर यावी यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

असे असताना मात्र पालिका स्वतःच्या सामाजिक,सांस्कृतिक,बहुद्देशीय केंद्रांची सुविधा व स्वच्छता बाळगण्यास विसरली आहे का ? असा प्रश्‍न यानिमित्ताने समोर येत आहे. चालू आर्थिक वर्षीय 2016-2017 च्या अर्थसंकल्पात महानगरपालिकेने मालमत्ता देखभाल व दुरुस्तीमाध्यमातून 11 कोटी 29 लाख एवढी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या आर्थिक तरतुदीतून सीबीडी सेक्टर – 8 आर्टिस्ट व्हिलेज मधील महानगरपालिकेचे ‘मदर तेरेसा बहुद्देशीय सुविधा केंद्रा’च्या इमारतीची अंतर्गत व बाह्य दुरुस्ती करण्यात यावी. अशी मागणी सीबीडी बेलापूर भाजपा महिला मोर्चा महामंत्री दिपाली घोलप यांनी आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.