सीबीडी बेलापूर येथील इमारत कोसळण्याच्या अवस्थेत

0

नेरुळ । सीबीडी बेलापूर शहाबाज से. 19 येथे असलेली पालिकेची इमारत जीर्ण झालेली आहे. ती कोसळण्याच्या अवस्थेत आहे. या इमारतीची दुरुस्ती करा अथवा पुनर्बांधणी करवू अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेचे अध्यक्ष ओमकार गंधे यांनी भविष्यातील उद्भवणारे धोके लक्षात घेऊन पत्र लिहिले आहे. पालिकेने ही इमारत आपल्या कर्मचार्‍यांसाठी रहिवासी वापरासाठी बांधली होती. मात्र, 2005 सालापासून या ठिकाणी एकाही पालिका कर्मचार्‍यांचे कुटुंब राहत नाही. त्यामुळे सध्या मोकळ्या झालेली ही इमारत पडीक झाली आहे, तर कित्येक वर्षांपासून ही इमारत पूर्णपणे मोडकळीला आलेली असून कुत्रे, गर्दुल्ले यांचे आश्रयस्थान झाली आहे. इमारतीला सर्व बाजूने तडे गेलेले आहेत, तर इमारतीतील अंतर्गत भागात पडझड झालेली आहे. त्यामुळे ही इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. असे झाले तर रस्त्याच्या कडेला ही इमारत असल्याने जीवितहानी अथवा दुखापत होण्याची शक्यता आहे.

इमारतीमुळे परिसर अस्वच्छ
इमारतीची काळजी व स्वछता राखण्यास कोणीही नसल्याने पुढील काळात येथे कचर्‍याचे ढीग साठण्याची शक्यता असून सध्या काही ठिकाणी कचरा पडलेला दिसून येत आहे. त्यामुळे आजूबाजूचा परिसर कितीही स्वच्छ असला, तरी या इमारतीमुळे परिसर अस्वच्छ बनू लागला आहे.त् यामुळे पालिकेने स्वच्छता अभियान राबवताना या इमारतीत स्वच्छता मोहीम राबवून ती दुरुस्त अथवा पुनर्बांधणी करून नागरिकांसाठी खुली करून समाजोपयोगी कार्यक्रम राबवावेत, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेचे अध्यक्ष ओमकार गंधे यांनी पालिकेकडे केली आहे.