सीमकार्ड कंपन्यांच्या अनावश्यक सेवेने मोबाइलधारक त्रस्त

0

शहादा। दूरसंचार कंपन्यांच्यावतीने सीम कार्डमार्फत विविध सेवा पुरविल्या जातात. परंतु अनेकदा त्याबाबत ग्राहकांची परवानगी घेतली जात नाही. यामुळे ग्राहकांना नाहकचा भुर्दंड सोसावा लागत आहे. मागणी नसतांना पुरविल्या जाणार्‍या या सुविधांमुळे ग्राहक संभ्रमात पडल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे मोबाइलधारकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्या नागरिकांसाठी मोबाइल ही अत्यावश्यक सेवा झाली आहे. त्यातही स्मार्टफोनमुळे इंटरनेट वापरण्याचे प्रमाणही वाढले आहे. याचाच फायदा दूरसंचार कंपन्या घेत असून, अतिरिक्त सेवांचा भार ग्राहकांवर लादला जात आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचत असल्याचे दिसून येत आहे. ट्रायने याकडे लक्ष देत सीमकार्ड कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांद्वारे करण्यात येत आहे.

कंपन्यांच्या मनमानीने ग्राहकांना नाहक आर्थिक भूर्दंड
मोबाईलधारकांना सेवा देणार्‍या सीमकार्ड कंपन्यांनी विविध योजनांची प्रलोभने देत ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रकार सुरू केला आहे. एखाद्या योजनेच्या लोभाला बळी पडून ग्राहक सेवा घेतात. पण जेव्हा बिल द्यावे लागते, तेव्हा कपाळावर हात मारण्याची वेळ येत असल्याचे ग्राहकांचे म्हणणो आहे. यामध्ये डायलटोन, भजन, राशी-भविष्य, संगीत, क्रिकेट स्कोअर, इंटरनेट आदींचा समावेश आहे. या सुविधा ग्राहकांना पूर्वसूचना न देताच सुरू केल्या जात असल्याचे प्रकार घडत आहे. मोबाइल सेवा पुरविणार्‍या काही कंपन्या ग्राहकांच्या मोबाइलवर आपल्या मर्जीने अनेक सुविधा सुरू करीत आहे. ग्राहकांची परवानगी न घेता आपल्याकडील उपलब्ध सेवा ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रकार होत आहे. यामुळे ग्राहक नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.