सीमकार्ड केवायसीच्या नावाखाली भुसावळातील इसमाला 34 हजारांचा ऑनलाईन गंडा

भुसावळ : सीम कार्डची मुदत संपल्याने केवायसी करावे लागेल, असे सांगून अज्ञाताने भुसावळातील एकाची 34 हजारांमध्ये फसवणूक केली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात रविवारी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले
शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी हरनाम परचामल बठेजा (55) यांना मंगळवार, 20 डिसेंबर रोजी सकाळी आठ अनोळखी क्रमांकावरून कॉल आल्यानंतर संबंधित इसमाने मोबाईल नंबर सुरू ठेवण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करून दहा रूपयाचा रीचार्ज करा असे सांगितल्यावर बठेजा यांनी त्याप्रमाणे अ‍ॅप डाउनलोड केले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर नियंत्रण मिळवत त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन पध्दतीने 34 हजार 266 रुपये काढून घेतले. यासंदर्भात हरनाम बठेजा यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसात धाव घेत रविवारी तक्रार दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहा.निरीक्षक गणेश धुमाळ करीत आहेत.