सीमाताई सावळेंची निवड बिनविरोधच!

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक असलेल्या ज्येष्ठ नगरसेविका सीमाताई सावळे यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी भरण्यात आल्यानंतर या पदावर त्यांची बिनविरोध निवड निश्‍चित मानली जात आहे. स्थायी समितीत भाजपचे संख्याबळ जास्त असून, येत्या शुक्रवारी (दि. 31) अध्यक्षपदासाठी निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. सावळे या स्थायीच्या अध्यक्षपदी विराजमान होणार्‍या पहिल्या मागासवर्गीय महिला ठरणार असून, त्यांच्या रुपाने चळवळीतील कार्यकर्तीकडे महापालिका तिजोरीच्या चाव्या जाणार आहेत.

स्थायी समितीत भाजपचे बहुमत
स्थायीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून सीमाताई सावळे यांचा उमेदवारी अर्ज नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे. स्थायी समितीत 16 पैकी 10 सदस्य भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ज्येष्ठ नगरसेविका सीमाताई सावळे, आशा शेंडगे आणि हर्षल ढोरे या तिघांची नावे अध्यक्षपदासाठी आघाडीवर होती. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी आमदार जगताप यांच्या कट्टर समर्थक सीमाताई सावळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे अध्यक्षपदासाठी सावळे यांचा एकमेव अर्ज भरण्यात आला. शुक्रवारी (दि. 31) स्थायीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. सावळे यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थायीच्या अध्यक्षपदी एका मागासवर्गीय महिलेची निवड होणार आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत एकाही मागासवर्गीय महिलेले स्थायीचे अध्यक्षपद देण्यात आले नव्हते. परंतु, महापालिकेत प्रथमच सत्ता स्थापन केलेल्या भाजपने एका मागासवर्गीय महिलेले स्थायी समितीचे अध्यक्षपद देऊन इतिहास रचला आहे.

भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, खासदार अमर साबळे यांच्यासह पक्षाच्या सर्व पदाधिकार्‍यांमुळे मला पक्षाने स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा पारदर्शी कारभार करण्यावर आपला भर असेल. शहरातील सर्व नागरिकांना महापालिकेच्या सुखसुविधा आणि नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी स्थायी समितीत निर्णय घेतले जातील.
– सीमाताई सावळे, ज्येष्ठ नगरसेविका