जम्मू-काश्मीरच्या सीमारेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु असून, गोळीबार सुरु आहे. मंगळवारी पाकिस्तानी सैन्याने मोर्टारद्वारे तोफगोळे डागण्यात येऊन शाळांना लक्ष्य करण्यात आले. गोळीबार व तोफगोळ्यांच्या स्फोटांमुळे नऊ शाळांचे सुमारे 200 विद्यार्थी-विद्यार्थिनी अडकून पडले होते. त्यांच्यासोबत शाळेचे शिक्षक व कर्मचारीही अडकून पडल्याने भारतीय सैन्यदलाने बुलेटप्रूफ गाड्यांद्वारे त्यांची सुटका केली व त्यांना सुरक्षितस्थळी हलवले.
सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती
नौशेरा सेक्टरमधील भिवानी येथे सरकारी शाळेंत तब्बल 150 विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अडकून पडले होते. पाकिस्तानी बाजूने सातत्याने मोर्टारद्वारे तोफगोळे डागले जात होते. प्रत्यक्ष सीमारेषेपासून या शाळा केवळ तीन किलोमीटर अंतरावर होत्या. शाळेत विद्यार्थी अडकून पडल्याचे कळल्यानंतर भारतीय सैन्यदलाने तातडीने हालचाली करत, या शाळेत बुलेटप्रूफ वाहने पाठवली व सर्वांची सुखरुप सुटका केली. तर सहर येथे 50 विद्यार्थी व इतर कर्मचारी, शिक्षक अडकले होते. त्यांचीही सुटका करण्यात आली. सर्व विद्यार्थी व इतर कर्मचारी, शिक्षक पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.