सीमावर्ती क्षेत्रात रेतवॉर!

0

नवापूर। महाराष्ट्र -गुजरात सीमेवर अवैध रेती उपसा करण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. यावर अंकुश राखण्यात अपयश येत असतानाच बुधवारी रात्री प्रांतधिकारी निमा अरोरा यांच्या पथकाने कारवाई धडाकेबाज कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नवापूर तालुक्यातील सरपणी नदीच्या रेतीघाटांचा ठेका नसतानाही या ठिकाणी नाव, डंपर, ट्रक, ट्रॅक्टरद्वारे बेकायदेशीर पद्धतीने वाळू काढण्याचे काम मोठया प्रमाणात सुरू होते. महसुल विभागाच्या प्रांतधिकारी निमा अरोरा यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नवापूरचे तहसीलदार प्रमोद वसावे, पोलीस निरीक्षक रामदास पाटील, सहायक पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांच्यासह पथकाने करंजवेलगत असलेल्या उकाईच्या फुगवटयात व सरपणी नदीत असलेल्या उकाईच्या फुगवटयात व सरपणी नदीपाञात छापा टाकला. त्यात सात वाळू काढण्याच्या मशिनींसह दोन बोटी जप्त केल्या आहेत. यावेळी आरोपी गुजरातमध्ये पळून गेल्याने त्यांना अटक होऊ शकली नाही. गुजरात पोलिसांनी आरोपींना मदत केल्याचा आरोप तहसीलदार वसावे यांनी केल्याने गुजरातचे पोलीस आणि वसावे यांच्यात बराच वेळ तू-तू-मै-मै झाली.

आरोपी घटनास्थळाहुन फरार
या कारवाईनंतर आरोपी घटनास्थळाहुन फरार झाले असून पोलीस व महसुल विभागाच्या अधिकार्‍यांनी त्यांचा बोटीचा साहाय्याने पाठलाग केला परंतु आरोपी पाण्यातुन टायर ट्युब लाऊन पळुन जाण्यात यशस्वी झाले. राञी 8 वाजता जेसीबी दवारे ज्याठिकाणी वाळु काढली जाते त्या भागाला संपूर्णता उध्वस्त देखील करण्यात आले. पाण्यातील मोठया बोटी क्रेन द्वारे 10 वाजता बाहेर काढण्यात आल्या व तो संपुर्ण परिसर महसुल विभाग व पोलिसांनी ताब्यात घेतला. गुजरात राज्याचा भागाला उच्छल महसुल विभाग व पोलिसांनी ताब्यात घेतला. राञीच्या वेळीच तहसीलदार प्रमोद वसावे व महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी तसेच पोलीस कर्मचार्‍यांनी ही कारवाई पूर्ण केली व पंचनामा केला.

गुजरात पोलीस-तहसीलदारांची जुंपली
महाराष्ट्र-सीमावर्ती भागात कारवाई झाल्याने आरोपी पळुन जाण्यास यशस्वी झाले. या दरम्यान गुजरात राज्यात फरार झालेल्या आरोपींचा शोध घ्यावा म्हणुन गुजरात राज्यातील उच्छल पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक एस.के.चारेल यांना सांगितले गेले. मात्र पाण्याची पातळी खोल असल्याने आरोपींना पकडणे शक्य झाले नाही असे सांगितले. आरोपींचा पाठलाग गुजरात पोलिसांनी केला नाही असा आरोप यावेळी तहसीलदार प्रमोद वसावे यांनी केला. उपनिरीक्षक चारेल यांनी आरोपी पकडण्यास मदत न करता माझ्याशी हुज्जत घातली आणि माझ्यावर चालून आल्याची माहिती तहसीलदार प्रमोद वसावे यांनी दिली. यावेळी दोघांची जोरदार शाब्दिक चकमक उडाली. सदर कारवाई तहसीलदार प्रमोद वसावे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, नायब तहसीलदार बी एस पावरा, पुरवठा निरीक्षक मिंलिद निकम, रमेश वळवी, राजु गवळी, डी.जे.सांळुखे, विनायक गावीत, जे के गायकवाड, पी.एस जामोदकर, ए एस शेख, पी पी वसावे, ए.डी यादव, ए.टी कोकणी, जे.एस तळवी, सुखलाल गावीत, पो.का.योगेश थोरात, मुकेश पवार, हितेश पाटील यांनी केली.

उकाईच्या रेतीची जास्त मागणी
उकाईच्या वाळुची गुजरात व महाराष्ट्रात जास्त मागणी आहे. या वाळुला जास्त भाव मिळतो. येथे पाण्याची खोली जास्त असल्याने येथे बोटीतुन रेती काढली जाते. स्वच्छ व बारीक दर्जेदार रेती निघत असल्याने उकाई धरणातील वाळुला मोठया प्रमाणात भाव आहे. येथील रेती मुंबई, नाशिक, सुरत, अहमदाबाद, व्यारा, निझर अशा महाराष्ट्र व गुजरातमधील प्रमुख शहरात जाते. या कारवाईने अवैध वाळू उपसा करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.