सीमा बंदी असतांनाही मजुरांचे लोंढे नंदुरबार जिल्ह्यात

0

तळोदा: कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता राज्यासह जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतूक बंद आहे. मात्र, असे असताना शहादा तालुक्यातील तोरणमाळ येथील मजूर पहाटेच्या सुमारास गुजरात राज्यातून 7 ते 8 ट्रक भरून आल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली.
गुजरात राज्यात रोजगारासाठी स्थलांतरीत झालेल्या शहादा तालुक्यातील तोरणमाळ येथील 787 मजूर आमलाड येथे दाखल झाले आहेत. तळोदा येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांनी त्यांची तपासणी केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल चौधरी हे उपस्थित होते. गुजरातमधून आलेल्या 787 मजुरांची योग्य ती आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी कोणीही कोरोना बाधित आढळून आला नाही. तरी तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गुजरात राज्यातील मढ़ी येथील साखर कारखाना येथे शहादा तालुक्यातून रोजगारासाठी 700 च्यावर मजूर यंदा मजूरीसाठी गेले होते. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांना गावी परतणे शक्य झाले नाही. त्यामुळे मंगळवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास शेजारील निझर तालुक्यातील व्यावल येथील चेक पोस्ट नाक्यावर त्यांच्या वाहनाना अडविण्यात आले. याबाबत तोरणमाळचे माजी सरपंच सिताराम पावरा यांना याबाबत माहिती देण्यात आली. सिताराम पावरा यांनी याबाबतीत लागलीच शहादा तळोदा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी यांच्याशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली. मजुरांच्या वाहनांना परवानगी देऊन त्यांना तळोदा तालुक्यातील येथील विलगीकरण कक्षात आणण्यात आले. आमलाड येथील विलगीकरण कक्षात आ.राजेश पाडवी यांनी मजुरासोबत लहान बालके असल्याने त्यांच्या नास्ताची व्यवस्था करून दिली.

गावी राहण्याचे आदेशगु

गुजरात-महाराष्ट्र राज्याचा सीमेवर पोलीस कर्मचारी यांनीही वाहने रोखून धरत शहादाचे प्रांताधिकारी चेतन गिरासे यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने भेट घेत माहिती जाणून घेतली. सीमेवर दाखल झालेल्या मजुरांचे स्क्रीनिंग करुन मगच त्यांना जिल्ह्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले. यानंतर सर्व मजुरांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारून गावी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.