मुंबई : कर्नाटकमधील कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या नेत्याने केलेल्या वक्तव्य पडसाद आता सीमाभागात उमटू लागले आहेत. वादग्रस्त वक्तव्याने तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने काल शनिवारी सायंकाळपासून दोन्ही राज्यांदरम्यानची बससेवा बंद करण्यात आली आहे. कानडी भाषकांची संघटना असलेल्या कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर उभे करून गोळ्या झाडल्या पाहिजेत, असे वक्तव्य केले होते. यावर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले होते. तसेच काल शिवसेनेने सीमेवर जाऊन तिरडी यात्रा काढत आंदोलन केले होते. यामुळे सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी शनिवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कोल्हापूरचे कनिष्ठ आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी दिली. तर कोल्हापूर आगारातील कर्नाटकच्या बसगाड्या बाहेर काढण्यात आल्या. तसेच महाराष्ट्रातून बेळगावकडे जाणाऱ्या कर्नाटकच्या बसना कोल्हापूर बस स्थानकात येण्यास मज्जाव करण्यात आला. यामुळे या बस स्थानकाच्या बाहेरूनच प्रवाशांना उतरवून कर्नाटकमध्ये रवाना झाल्या. याचबरोबर कोल्हापूरहून गडहिंग्लजला जाणाऱ्या बसही दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. या बसना निपाणीमधून काही अंतर कर्नाटकच्या सीमेतून जावे लागते. या बसवर दगडफेक किंवा कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे.