चेन्नई : सर्जिकल स्ट्राइक हे पाकिस्तानला दिलेलं चोख प्रत्युत्तर होतं. पाकिस्तानने त्यातून धडा घेतला असेल किंवा नसेल पण सीमेवरील आमची कारवाई यापुढेही कायम राहणार,असे देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी बजावले. सर्जिकल स्ट्राइकला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘पराक्रम पर्व’ साजरे केले जात असताना सीतारामन यांनी आज पाकिस्तानला कठोर शब्दांत इशारा दिला.
पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते तसेच त्यांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी भारतात पाठवण्यात येते. याविरोधात नियमितपणे भारताची कारवाई सुरू असून निश्चितच यातून पाकला जरब बसेल, असा विश्वासही सीतारामन यांनी व्यक्त केला.
उरीतील हल्ला पाकपुरस्कृतच
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरी येथे केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर २८-२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक देऊन सर्जिकल स्ट्राइक केला. याबद्दल बोलताना उरी हल्ला पाकपुरस्कृतच होता, असा पुनरुच्चार सीतारामन यांनी केला.
राफेलबाबत चारवेळा दिलं उत्तर
राफेल करारावरून विरोधकांकडून जे आरोप करण्यात येत आहेत, त्यावरही सीतारामन बोलल्या. मी यावर चारवेळा बाजू स्पष्ट केली असून लेखी स्वरूपातही उत्तर दिलं आहे. तेच सत्य आहे. मी संसदेमध्ये हे स्पष्ट करणार आहे. मात्र मी जे बोलले ते तुम्ही स्वीकारणार आहात का?, असा तिरकस प्रश्न त्यांनी केला.