नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) केलेल्या कारवाईत सोमवारी भारत-बांगलादेश सीमेवर मोठ्या प्रमाणात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या. याप्रकरणी बीएसएफने पाकिस्तानातून आलेल्या संशयीत शरीफ उल शाह (32) यास ताब्यात घेतले आहे. शरीफकडून दोन हजाराच्या 96 हजार रुपये मुल्याच्या बनावट नोटा ताब्यात घेतल्या आहेत.
यापूर्वी बांगलादेशच्या सीमेवरील मुर्शिदाबाद अझिझूर रेहमान यास 8 फेब्रुवारीला ताब्यात घेण्यात आले होते. अझिझूर रेहमान मुळचा पश्चिम बंगालमधील मालदा येथील रहिवासी आहे. त्याच्याकडे दोन हजार रूपयांच्या 40 बनावट नोटा सापडल्या होत्या. चौकशीदरम्यान त्याने या नोटा पाकिस्तानात छापण्यात आल्याची कबुली दिली होती. याशिवाय, आपण बांगलादेशच्या सीमेवरून तस्करी करून नोटा भारतामध्ये आणल्याचेही सांगितले होते.