अहमदनगर: जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील दहीगावचे जवान सुनील रावसाहेब वाल्टे शहीद झाले आहे. ४० वर्षीय वाल्टे हे लष्करात नायब सुभेदार होते.
वाल्टे यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे मुदत वाढवून घेतली होती. ती देखील काही दिवसात संपणार होती. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक नववीत शिकणारी मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांचे आई-वडील शेतकरी आहेत. वाल्टे यांचे प्राथमिक शिक्षण दहीगावमध्ये झाले. त्यानंतर कोपरगावमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेऊन ते सैन्यात भरती झाले. देशातील विविध ठिकाणी त्यांनी सेवा दिली. नुकतीच त्यांना नायब सुभेदारपदी बढती मिळाली होती. मंगळवारी झालेल्या कारवाईच्या वेळी गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यात यश आले नाही.