सीरिज जिंकल्यावर धोनीने केला विराटचा खास सन्मान

0

कोलकाता: भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने नवीन कॅप्टन म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या विराट कोहलीचा इंग्लंडविरूध्दची सीरिज जिंकल्यावर खास पध्दतीत सन्मान केला. भारताचा पूर्णवेळ कॅप्टन झाल्यावर विराटच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच सीरिज जिंकली. या सीरिजमध्ये इंग्लंडला भारताने २-१ ने मात दिली. कोलकाता वनडे नंतर याबद्दलच धोनीने विराट कोहलीचे कौतुक एक विशेष भेट देत केले.

पंचांना केली विनंती
कटक वनडेमध्ये भारताने विजय मिळवल्यावर अंपायरनी मॅचचा बाॅल उचलत पॅव्हेलियनकडे जायला सुरूवात केली. त्यावेळी धोनीने या अंपायर्सना थांबवत त्यांच्याकडून मॅचचा बाॅल घेण्याची परवानगी मागितली. पंचांना विनंती करून मागितलेला हा बाॅल दिलदार धोनीने विराटच्या हातात देत त्याला ही भेट असल्याचे सांगितले. कॅप्टन धोनीशी आधीपासूनच दोस्ती असणाऱ्या विराटला ही भेट अनपेक्षित होती. ही भेट दिल्याबद्दल धोनीला त्याने धन्यवाद दिले आणि पॅव्हेलियनमध्ये गेल्यावर धोनीची या बाॅलवर त्याने स्वाक्षरीही घेतली.

विराटला देखील आनंद
दिसायला छोट्याशा दिसणाऱ्या या भेटींमध्ये खूप मोठा दिलदारपणा दडलाय. एखाद्या सेनानीने आपल्या छातीवरची पदके अभिमानाने मिरवणे आणि आपण पराक्रम गाजवलेल्या सीरिजमध्ये खेळला गेलेला बाॅल आपल्याला आपल्याच माजी कप्तानाने देणे यामागे हीच भावना, हाच गौरव आहे, असल्याचे बोलले जात आहे. या अनोख्या भेटीमुळे विराट देखील भलताच खुश दिसून आला.