मोसूल । सीरियन नागरिकांवर रासायनिक हल्ला करण्यासाठी ज्या शायरत हवाई तळाचा वापर झाला त्याच तळाला गुरुवारी रात्री अमेरिकेने लक्ष्य केले. शायरत तळावर अमेरिकेने क्रूझ क्षेपणास्रने मोठा हल्ला चढवला. अमेरिकेने 50 पेक्षा जास्त क्रूझ क्षेपणास्र डागली. सीरियात रासायनिक शस्त्रांचा वापर झाल्याने आपण या कारवाईचे आदेश दिल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
मंगळवारी सीरियाच्या बंडखोरग्रस्त भागात रासायनिक हल्ला झाला होता. यामध्ये शेकडो नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे संपूर्ण जगात याबाबत चिंता व्यक्त होत आहे. सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांनी बंदी असलेली रासायनिक अस्त्र वापरल्याची अमेरिकेची धारणा आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री अमेरिकेकडून क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला.
अमेरिकेचे राष्ट्रीय हित नजरेसमोर ठेवूनच ही कारवाई करण्यात आली, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेने केलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे. भविष्यात निष्पाप नागरिकांवर पुन्हा विषारी गॅसने हल्ला होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले, असे ट्रम्प यांनी सांगितले. सीरियातील रक्तपात, कत्तल थांबवण्यासाठी त्यांनी अन्य देशांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले.
दरम्यान, अमेरिकेच्या या कारवाईचा असद सरकारला पाठिंबा देणार्या रशियाने विरोध केला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सांगितले की, अमेरिकेचा हा हल्ला बेकायदेशीर असून, आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. या हल्ल्यामुळे उभय देशांतील संबधावर गंभिर परिणाम होतील. असद सरकारचे मित्र असलेल्या इराणनेही हा हल्ल्याचा विरोध केला आहे. तर दुसरीकडे इस्त्रायल, तर्कस्तान आणि इतर देशांनी या हल्ल्याबाबत अमेरिकेला पाठिंबा दिला आहे.
टॉमहॉकची खास वैशिष्ट्ये
शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेच्या नौदलाकडे दोन धोकादायक जहाजविरोधी क्षेपणास्त्रे होती. त्यात हारपून आणि टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा समावेश होता. या दोन क्षेपणास्त्रांच्या मदतीने अमेरिकेने तत्कालीन सोव्हिएत रशियाशी दोन हात करण्याची रणनीती आखली होती.
टॉमहॉक क्षेपणास्त्र 20 फूट लांब असून त्यांचे वजन 3300 पाऊंड इतके आहे. हे क्षेपणास्त्र जहाज आणि पाणबुडीवरून सोडता येते. हे क्षेपणास्त्र 600 मैलापर्यंत जाऊ शकते. त्यानंतर हे क्षेपणास्त्र गोलाकार अवस्थेत भ्रमण करत आपले लक्ष्य शोधते आणि त्याच्यावर आदळते.
1991 मध्ये सोव्हिएत रशियाचे विभाजन झाल्यावर अमेरिकेने समुद्री लढाईऐवजी जमिनीवरील लढाईवर लक्ष केंद्रित केले. अमेरिकेने या क्षेपणास्त्रांनी इराक, सर्बिया, अफगाणिस्तान, लीबिया आणि सीरियावर हावई हल्ले केले आहेत.
समुद्री हल्ल्याचा धोका टळल्याचे स्पष्ट झाल्यावर अमेरिकेच्या नौदलाने जुन्या टॉमहॉक आणि हारपून क्षेपणास्त्रांना बाजूला ठेवले. त्यानंतर अमेरिकेने टॉमहॉक क्षेपणास्त्रांमध्ये सुधारणा केल्या. जमीनीवरील हल्ल्यासाठी टॉमहॉक हे अमेरिकेचे आवडते क्षेपणास्त्र आहे.
2015 मध्ये कॅलिफोर्नियातील नौदलाच्या तळावर घेतलेल्या चाचणीत नौदलातील तंत्रज्ञानांनी टॉकहॉक क्शेपस्त्राणात संशोधन करताना उड्डाण करत असताना लक्ष्याचा शोध घेऊ शकेल, अशी यंत्रणा टॉमहॉक क्शेपणस्त्रांवर लावली.
या चाचणीचा उल्लेख अमेरिकेने गेम चेंजर असा केला. त्याची मार करण्याची क्षमता 1000 मैल लांब असल्याचे म्हटले होते. 2017 च्या अर्थ संकल्पात अमेरिकेने 100 टॉमहॉक क्शेपणास्त्र तयार करण्यासाठी 187 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची तरतुद केली आहे. एका टॉमहॉक क्षेपणास्त्राची किंमत जवळपास सहा कोटी रुपये इतकी आहे.