दमास्कस – सीरियाच्या हवाई तळावर मिसाइल हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमध्ये ८० हून अधिक लोक ठार झाले आहे. सोमवारी सकाळच्या वेळेस हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यांमधे रासायनिक अस्त्रांचाही वापर करण्यात आल्याचा आरोप होत असून, सीरिया सरकार आणि मीडियाने अमेरिकेवर आरोप केले आहे. पण, अमेरिकेने सीरियाचे हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहे.
सीरियन बंडखोरांचे शहर दूमा येथे रविवारी कथित रासायनिक हल्ला झाला होता. याची सीरियात कार्यरत पाश्चात्य संस्था व्हाइट हेलमेटने यांनी ट्वीट करून हि माहिती दिली होती. याचबरोबर पीडितांचे फोटो व पोस्ट करून या हल्ल्यामध्ये 70 जणांच्या मृत्यूचा दावा देखील करण्यात आला होता. परंतु या हल्ल्यासाठी अमेरिकेसह विविध देशांनी सीरिया सरकारला जबाबदार ठरविले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर थेट रशियावर आरोप केला होता. सीरियाला रशियाचे समर्थन आहे, याचाच अर्थ असा की, रशिया रासायनिक हल्ल्यासाठी जबाबदार आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.
अमेरिकाच नव्हे, तर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी सुद्धा सीरिया सरकारला रासायनिक हल्ल्याचा दोषी म्हणत बदला घेणार अशी धमकी दिली होती. या दोन्ही देशांनी दिलेल्या धमक्यांच्या दुसऱ्याच दिवशी सीरियाच्या एअरबेसवर मिसाइल हल्ले झाले आहेत. याबाबत सीरिया सरकार आणि रशियाने या मिसाइल हल्ल्यांसाठी अमेरिका आणि फ्रान्सला जबाबदार धरले. पण, अमेरिकेने हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत.