अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनने डागली क्षेपणास्त्रे
100 क्षेपणास्त्रांनी दमिश्क हादरले, रशिया खवळला
दमिश्क (सीरिया) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर कालच हवाई हल्ल्याची धमकी दिली असताना, शनिवारी सकाळी अमेरिकेसह फ्रान्स, ब्रिटन या मित्र राष्ट्रांनी सीरियावर हवाईहल्ला लढविला. तब्बल 100 पेक्षा जास्त क्षेपणास्त्र सीरियाची राजधानी दमिश्कवर डागण्यात आल्याने हे शहर हादरून गेले होते. अनेक ठिकाणी हे हवाईहल्ले चढविण्यात आले. सीरियातील कथित रसायनिक हल्ल्यात किमान 40 जणांचा मृत्यू झाल्यानंतर हे हल्ले मित्र राष्ट्रांनी सुरु केले आहेत. या हल्ल्यांनी रशिया खवळला असून, संयुक्त राष्ट्रे (यूएन)ची तातडीची बैठक बोलावली आहे. हल्ले थांबले नाही तर जशाच तसे उत्तर देण्याचा इशाराही रशियाने दिला आहे.
आम्हीही उत्तर देऊ : सीरियाने ठणकावले
सीरियाच्या शासकीय वृत्तवाहिन्या माहितीनुसार, वैज्ञानिक संशोधन संस्था व इतर सरकारी कार्यालयांवर मित्र राष्ट्रांनी क्षेपणास्त्रे डागली आहेत. या क्षेपणास्त्रांमुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली असून, चोहीकडे धुरांचे लोट उठले होते. तसेच, एकच हाहाकार उडाला होता. या हल्ल्यांना सीरियाच्या हवाई दलाने चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल त्यांनीही हल्ला चढविला व 13 क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली. या लोकांना आम्ही योग्य प्रत्युत्तर देऊ, असा इशारा सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्वीटरद्वारे दिला आहे. मित्र राष्ट्रांचे हल्ले हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असून, त्याविरोधात यूएनमध्ये आवाज उठविण्याचा इशाराही राष्ट्राध्यक्षांनी दिला आहे.
ही गृहयुद्धात दखल नाही : ब्रिटन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी रात्री सीरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांना धमकी देत, रासायनिक हल्ल्यांसाठी असद यांना शिक्षा ठोठावली जाईल, असा इशारा दिला होता. संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित केलेली रसायनिक अस्त्रे सीरिया वापरत असल्याबद्दल सीरियावर हल्ला करण्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला होता. त्यानुसार, शनिवारपासून हे हवाई हल्ले सुरु करण्यात आले आहेत. या हल्ल्यांत मित्र राष्ट्रांचे काहीही नुकसान झालेले नाही, अशी माहिती अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी दिली. आम्ही सीरियाच्या गृहयुद्धात उतरलो नाही, तर सीमित लक्ष्यावर हल्ला चढवित आहोत, अशी माहिती ब्रिटनच्या पंतप्रधान टेरिजा मे यांनी दिली.