सीवूड्स बस थांब्यावर पार्किंगचा विळखा कायम

0

नेरुळ । सीवूड्स रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिमेला असलेल्या बस थांब्यावर अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर वाहने उभी केली जात आहेत. या वाहनांमुळे बसने प्रवास करणार्‍या प्रवाशाना गाड्यांमधून वाट काढीत बसमध्ये चढावे आणि उतरावे लागत आहे. नवी मुंबई शहराची नियोजनबद्ध मांडणी झाल्यामुळे आणि नागरिकांना देण्यात येणार्‍या सर्व सोईसुविधा यामुळे या शहराला 21 व्या शतकातील शहर असल्याचे संबोधण्यात येते सीवूड्स रेल्वेस्थानक हे आशिया खंडातील सर्वात अत्यधुनिक रेल्वे स्थानक बनत आहे. या सुरू असलेल्या कामामुळे वाहनांच्या पार्किंगचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. रेल्वेने आल्यावर सीवूड्समध्ये इतर भागांत जाण्यासाठी किवा सीवूड्समधील इतर भागातून रेल्वेस्थानक गाठण्यासाठी शालेय आणि कॉलेजचे विद्यार्थी, कामानिमित्त ये जा करणार्‍या नागरिकांची मोठी वर्दळ सीवूड्स रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिमेला स्थानकाबाहेर असणार्‍या बस थांब्यावर असते.

वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी
या बस थांब्यावरून वाशी, उलवे, करावे गाव, कोपरखैरणे, सेक्टर 48 नेरूळ, घणसोली, ठाणे आदी ठिकाणी विविध बस ये-जा करतात या भागात पार्किंगची सुविधा नसल्याने शहराच्या विविध भागातून कामानिमित्त येणारे नागरिक रेल्वेस्थानकाच्या बाहेरील रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करतात. या पार्किंगमुळे अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता व्यापला जाते. त्यामुळे अपघातदेखील होत आहेत. बस थांब्यावर अनधिकृतपणे उभ्या केल्या जाणार्‍या वाहनांमुळे बसने प्रवास करणार्‍या नागरिकांना बसमध्ये चढताना किवा उतरताना उभ्या असलेल्या वाहनांमधून वाट काढावी लागत आहे. बस प्रवाशांना घेण्यासाठी किवा उतरण्यासाठी थांब्यावर उभी राहिली असता रस्त्यावर वाहतूककोंडीदेखील होत आहे तसेच बर्‍याच वेळा लहान मोठे अपघातदेखील या पूर्वी झाले आहेत, वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत.

याठिकाणी बस थांब्यावर अनेक खासगी गाड्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे अनेकवेळा बस पकडण्यास त्रास होतो. त्यामुळे या गाड्यांना दंड करण्याची गरज आहे.
-गौरव सुळे, नागरिक सिवूड्स.