सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने खून करणार्‍या त्याच्या दोन मित्रांना अटक

0

नंदुरबार। ये थील अपहृत शालेय विद्यार्थ्याचे खून प्रकरण सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या दहा तासात नंदुरबार पोलिसांनी उघडकीस आणले असून निर्दयपणे खून करणार्या त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. अल्पवयाच्या मुलांनी चोरीच्या उद्देशानेच ही हत्या क्रूरपध्दतीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याने पोलिसांबरोबरच पालक वर्गालाही धक्का बसला आहे. याप्रकरणाने शालेय विद्यार्थीही सून्न झाले असून त्यांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे. नंदुरबार येथील डी.आर. हायस्कूलमधे इयत्ता 9 वीत शिकणारा राज नंदकिशोर ठाकरे(15) हा दिनांक 7 जुलै रोजी सायकलीवर शाळेत गेला होता.

मृतदेह खामगाव रस्त्यावरील पुलाजवळ आढळून आला
मात्र तो घरी परत न आल्याने त्याच्या वडिलांनी पोलिसठाण्यात फिर्याद नोंदवली.दरम्यान दि.8 जुलै रोजी सकाळी 8 वा.सुमारास राज याचा मृतदेह खामगाव रस्त्यावरील एका पुलाजवळ आढळून आला होता.तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा गळा चिरण्यात आला होता.पोलिसांनी या घटनेच्या तपासासाठी चक्रे फिरवून अवघ्या दहा तासातच गुन्हा उघडकीस आणला.राजचे मित्र असलेल्या दोन अल्पवयीन मुलांनीच पैशांसाठी त्याचा निर्दयपणे खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.या दोन्ही मुलांनी राजला शाळेतून स्कुटीने खामगाव रस्त्याकडे नेले.

फुटेज गुन्हा उघडकीस आणण्यास कारणीभूत
त्याआधी त्यांनी दंडपाणेष्वर मंदिराजवळ पेट्रोलपंपावरून तीस रुपयाचे पेट्रोल भरले होते.यापंपाजवळ असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधे ते कैद झाले होते.याची त्यांना कल्पनाच नव्हती.तेच फुटेज गुन्हा उघडकीस आणण्यास कारणीभूत ठरले.खामगाव रस्त्यावर ट्रीपलसीट मोटरसायकलीने जात असतांना लघवीच्या बहाण्याने त्यांनी मोटरसायकल उभी केली.यावेळी एका मित्राने राज याच्या पाठितून रामपूरी चाकूचा वार केल्याने राज खाली कोसळला. तेवढ्यात त्या दोघा मित्रांनी राजचा गळा चिरून ठार केले.ते एवढ्यावरच थांबले नाहित तर मयत राजच्या खिशातून घराची चावी काढली.

मित्रांनी केले क्रुर कृत्य
नंतर दोन्ही मित्रांनी राजचे घर गाठले व चावीने उघडून घरातील सोन्याचे दागिने आणि साडेपाच हजार रुपये रोख असा एकूण 75 हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू, रोख रक्कम, दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. पार्टीसाठी त्यांना पैसे हवे होते, म्हणून राजच्या मित्रांनी हे क्रूर कृत्य केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती काल पोलिस अधीक्षक डॉ.राजेंद्र डहाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत वाघुंडे, पोलिस उपअधीक्षक रमेश पवार, पोलिस निरिक्षक दीपक बुधवंत, नितीन चव्हाण यांच्यासह या गुन्ह्याचा यशस्वी तपास लावणारे पथक उपस्थित होते.