सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा संशयित कोण?

0

जळगाव : सिंधी कॉलनी परिसरातील निवासस्थानी असलेल्या गोडावूनमध्ये शिरत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा संशयित कोण? हे जाणून घेण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला गती दिली असून गोदामाला लागलेल्या आगीच्यासंदर्भात चित्रीत फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले.सिंधी कॉलनीत सेवा मंडळाजवळ ओम मलिक व चंदन मलिक वास्तव्यास असून येथे गोदामात चंदन इंटरप्राईजेसचे कॉस्मेटीक सौंदर्यप्रसाधनांचे साहित्य ठेवले होते. सोमवार दि. 2 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास गोदामाला अचानक आग लागून त्यात सुमारे सात लाखाचे साहित्य जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

दोषींवर कारवाई करण्याची मागणी
आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज लावण्यात आला होता. दरम्यान, बुधवार दि. 4 रोजी मलिक परिवाराने कॅमेराचे फुटेज बघीतल्यावर ही आग प्लॅनींग करून लावण्यात आली, असा आरोप केला होता. मलिक कुटुंबाचा घातपात करण्याचा याघटनेमागे उद्देश असू शकतो, असा आरोप राजेश मलिक यांनी गुरूवारी केला होता. याप्रकरणी सखोल तपास होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी करून याप्रकरणी तक्रार करण्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. आगीच्या घटनेचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजमध्ये झाले असून त्यात एक अज्ञात व्यक्ती सायकल घेऊन येत गोडावूनमध्ये जात असल्याचे दिसते. तो दोन मिनीट गोदामात थांबतो. नंतर तो बाहेर येताच आग लागते. आग लागल्याचे प्रतिबिंब कारच्या टायरला लावलेल्या प्लेटमध्ये दिसते.

अज्ञात व्यक्तीने आणलेल्या सायकलच्या कॅरीवर काही तरी बॉक्स ठेवल्याचे दिसते. तसेच सायकलला ड्रम असल्याचे दिसते. गोडावूनमध्ये येण्यामागचा संशयिताचा काय उद्देश असू शकेल? तो नेमका कोण? तो गोडावूनमध्ये कशासाठी गेला? इत्यादी प्रश्न उपस्थित झाले असून याचा उलगडा करण्याच्या अनुषंगाने तपासला गती देण्यात आली आहे. संशयित गोदामात जात असताना आणखी एक व्यक्ती बाजूला उभी असल्याचे दिसते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या हालचालींवर अन्य दोन तीन जण लक्ष ठेवून होते? असा दावा मलिक कुटुंबियांनी केला आहे.