अभियान संयोजक संदीप देशमुख यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
मुक्ताईनगर- ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतीतील कला गुणांना वाव मिळण्यासह त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी संपुर्ण राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सी.एम चषकाचे विधानसभा, जिल्हा, राज्य स्तरावर आयोजन करण्यात आले होते. मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात सी.एम.चषक अंतर्गत आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धा, उडान 100 मीटर धावने, मुद्रा योजना 400 मीटर धावणे, शेतकरी सन्मान कबड्डी योजना, इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धा, मेक ईन इंडिया रांगोळी स्पर्धा, खो-खो स्पर्धा झाल्या तर विधानसभा क्षेत्रातून सुमारे 65 हजार 885 स्पर्धकांनी सहभाग घेतला. उत्तर महाराष्ट्रातील ही संख्या सर्वाधिक असल्याने मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय अंतिम बक्षीस वितरण सोहळ्यात मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे सी.एम.चषक अभियान संयोजक संदीप देशमुख यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
मुक्ताईनगर विधानसभा उत्तर महाराष्ट्रात प्रथम
उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक 65 हजार 885 स्पर्धक सहभागी झाल्याने मुक्ताईनगर विधानसभा सीएम चषकात प्रथम ठरला. स्पर्धेतील विजयी संघासह स्पर्धकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे यांच्या सही असलेले प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमास शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजप युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, खासदार रक्षा खडसे, आमदार संतोष दानवे, आमदार उन्मेश पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, वार रूम प्रतिनिधी प्रफुल्ल जवरे विनोद चौधरी उपस्थित होते.
नाथाभाऊंचे पक्ष संघटन अधोरेखीत -संदीप देशमुख
माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, डॉ.राजेंद्र फडके यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात सी.एम.चषकाचे आयोजन करण्यात आले. 65 हजारावर युवक-युवतीनां भाजपा सोबत जोडू शकल्याचा आनंद असून स्पर्धांना योजनेचे नाव दिल्याने सरकारच्या विविध योजनाचा प्रसार करता आला तसेच उत्तर महाराष्ट्रातून सर्वात जास्त खेळाडूंच्या सहभागामुळे आमदार एकनाथराव खडसे यांचे पक्ष संघटन परत एकदा अधोरेखित झाल्या बद्दल मनस्वी आनंद असल्याचे अभियान संयोजक संदीप देशमुख ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना म्हणाले.