सुंदर गुर्जरची सुवर्ण पदकाला गवसणी

0

लंडन । लंडनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये जयपूरचा अ‍ॅथलिट सुंदर गुर्जरने एफ-46 वर्गात भाला फेक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. सुंदरने 60.36 मीटर भाला फेकत ही सुवर्ण कामगिरी बजावली आहे. त्यामुळे सुंदरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भाला फेक स्पर्धेच्या सुवर्ण पदकावर सुंदर गुर्जरने नाव कोरले आणि भारताचे पदकाचे खाते उघडले आहे. 57.93 मीटर भाला फेकत श्रीलंकेच्या हेरात दिनेश याने रौप्य पदकावर नाव कोरले आणि 56.14 मीटर भाला फेकत चीनच्या गुओ चुनलैंगने कास्य पदक पटकाविले आहे. पॅरा स्पोर्ट्स असोसिएशन, राजस्थानचे मुख्य समन्वयक दिने दिनेश कुमार उपाध्याय आणि आदी पदाधिकार्‍यांनी सुंदरच्या सुवर्ण कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे.

चांगले पुनरागमन
सुवर्ण पदक पटकाविल्यामुळे आज मी खूप आनंदी आहे. पॅरा अ‍ॅथलिट समितीच्या अध्यक्ष आणि माझ्या प्रशिक्षकांचा मी खूप आभारी आहे. खरं तर, मी माझ्या रिओच्या कामगिरीवर समाधानी नव्हतो. त्यावेळी मी निराश झालो होतो. परंतू, आजच्या कामगिरी पाहून मी पुन्हा एकदा चांगले पुनरागमन केले आहे. यापुढे मी आणखी चांगली कामगिरी करीन, अशी भावना सुंदरने पदक जिंकल्यानंतर व्यक्त केली. मला सुंदरला प्रोत्साहित करावे लागले. तेव्हा सुंदरची कामगिरी उंचावली. त्याला चांगली कामगिरी बजावता आली. मला आशा आहे की, यापुढे तो आणखी पदकावर आपले नाव कोरेल, अशी प्रतिक्रिया सुंदरच्या प्रशिक्षकांनी दिली.