नवी दिल्ली । आपल्यापैकी जवळपास सर्वचजण हे गूगलचा वापर करतात. जगातील आघाडीची कंपनी असलेल्या गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हे भारतीय वंशाचे आहेत. भारतीय वंशाच्या याच सुंदर पिचाई यांनी आपल्या पगाराबाबतीत एक नवा विक्रमच केला आहे. सुंदर पिचाई यांना गेल्या वर्षी वेतन आणि अन्य रक्कम मिळून तब्बल 200 मिलियन डॉलर (12.85 अब्ज रुपये) इतके वेतन मिळाले आहे.
आधीच्या वर्षाच्या तुलनेत ही रक्कम दुप्पट असून सरासरी काढल्यास महिन्याला त्यांना 100 कोटी मिळाले आहेत. पिचाई यांना 2015 साली 6 लाख 52 हजार 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढा पगार मिळाला होता. 2016 साली या रकमेत किंचित घट होऊन त्यांना 6 लाख 50 हजार अमेरिकन डॉलर मिळाले. अनेक वर्षांपासून कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या सुंदर पिचाई यांच्याकडे गूगलने ऑगस्ट 2015 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची (सीईओ) जबाबदारी सोपवली होती. सन 2016 मध्ये त्यांना 198.7 मिलियन डॉलर (अंदाजे 12.77 अब्ज रुपये) मूल्याचे कंपनीचे शेअर्स मिळाले होते. ही रक्कम 2015 साली मिळालेल्या पारितोषिकाच्या रकमेच्या दुप्पट आहे. त्यामुळे पिचाई यांचा एकूण पगार 12.85 अब्जांवर गेला आहे.
म्हणून मिळाला बोनस
सन 2016 मध्ये गूगलने नवे स्मार्टफोन, व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट, राउटर आणि व्हाईस कंट्रोल्ड स्मार्ट स्पीकर बाजारात आणले होते. या उत्पादनातून कंपनीला मोठा फायदा झाला होता. सुंदर पिचाई यांच्या नेतृत्वाखाली गूगलचा जाहिरात आणि यू-ट्युब व्यवसाय प्रचंड प्रमाणात वाढला आहे तसंच, कंपनीला मशिन लर्निंग, हार्डवेअर व क्लाउड कम्प्युटिंग क्षेत्रातही गुंतवणूक करणं शक्य झाले आहे. सुंदर पिचाई यांची सीईओपदावर बढती तसेच अनेक उत्पादने आणि त्यांचे यशस्वी लॉन्चिंग केल्यामुळेच गूगलच्या वेतनवृद्धी समितीने त्यांना जबरदस्त वेतन दिले आहे.