सुंदर व निरोगी त्वचेसाठी सकस आहाराची गरज

0

जागतिक त्वचा आरोग्य दिनानिमित्त

निगडी : सुंदर व तजेलदार त्वचेमुळे आपले व्यक्तीमत्व प्रभावशाली बनते. आपल्याला त्वचा संवेदनांची जाणीव करुन देतानाच पूर्ण शरीराचे वातावरण व विविध आघातांपासून संरक्षण करीत असते. आपली त्वचा निरोगी राखणे आवश्यक असून यासाठी सकस व चौरस आहार घेणे आवश्यक आहे. त्वचेचे विविध प्रकार असुन ऋतुमानानुसार व वातावरणातील बदलानुसार गरज असेल तरच सौंदर्यप्रसाधने वापरली पाहिजेत, असे मत त्वचारोग तज्ञ डॉ. सुहास माटे यांनी व्यक्त केले. येथील इंडियन असोशिएशन ऑफ डर्मेटॉलॉजी व स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्यावतीने जागतिक त्वचा आरोग्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

तज्ञांच्या सल्ल्याने उपचार
डॉ. माटे पुढे म्हणाले की, अनेक प्रकारच्या क्रिम, लोशन, शॉम्पू, साबण यामध्ये स्टीरॉईड व रसायने वापरलेली असतात. त्यांच्या दीर्घ वापरामुळे दुष्परिणाम होऊन त्वचेची हानी होऊ नये. म्हणून खोट्या जाहिरातींना बळी न पडता तज्ञांच्या सल्ल्याने उपचार करावेत. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात घाम येत असल्याने त्वचेची स्वच्छता राखणे गरजेचे असून स्वच्छ व सुती कपडे वापरावेत. यावेळी प्रश्‍नोत्तराच्या माध्यमातून केसांची निगा, आहार, विविध प्रकारच्या त्वचा विकारांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. सावरकर मंडळाच्या शिल्पा बिबीकर यांनी प्रास्ताविक केले. विनीता श्रीखंडे यांनी आभार मानले.