रायपूर । छत्तीसगडमधील बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवर पोलीस, सीआरपीएफ व कोब्रा जवान यांनी संयुक्तपणे राबवलेल्या नक्षलवादविरोधी कारवाईत तब्बल 20 नक्षलवाद्यांचा खात्मा करत पोलिसांनी सुकमा येथील नक्षलीहल्ल्याचा बदला घेतला. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सीआरपीएफ, जिल्हा पोलीस दल आणि कोब्रा कमांडोंनी जिलेबी ऑपरेशन नावाने चक्रव्यूह आखले होते. या कारवाईत एक जवान शहीद झाला असून, अन्य एक जवान जखमी झाला आहे. तब्बल 96 तांस हे ऑपरेशन सुरू होते. या कारवाईत सुरक्षा जवानांना वायूदलानेदेखील सहाय्य केले.
नक्षलवादी मृतदेह घेऊन पळाले
वायूसेनेच्या सहाय्याने नक्षलग्रस्त जंगल भागात ही मोहीम राबवण्यात आली. तीन दिवस चाललेल्या या मोहिमेतील जवानांना वायूसेनेच्या विमानांनी शस्त्रे, दारूगोळा व अन्नाचा पुरवठा केला. तसेच, नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची अचूक माहिती पुरवली. त्यामुळे तब्बल 20 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. या मोहिमेत दिडशे नक्षलवाद्यांना घेरण्यात आले होते. तसेच, हे नक्षलवादी पहिल्यांदाच कोब्रा कमांडोंच्या वेशात दिसून आले. अगदी घेराव घालून त्यांचा खात्मा करण्यात आल्यानंतर हे नक्षलवादी ठार झालेल्या साथीदारांचे मृतदेह घेऊन जंगलात पळून गेले.
एक जवानाचा मृत्यू दोन जखमी
याबाबत माहिती देताना सीआरपीएफचे महानिरीक्षक देवेंद्र चौहान यांनी सांगितले, की या मोहिमेत साडेतीनशे जवान सहभागी झाले होते. रविवारी सकाळी ही कारवाई सुरू झाली. ती मंगळवारी थांबवण्यात आली. सलग तीन दिवस सुरक्षा दलाचे जवान नक्षलवाद्यांशी झुंजत होते. नक्षलवादी हे काळ्या रंगाचा गणवेश धारण करतात. परंतु, पहिल्यांदाच ते कोब्रा कमांडोंच्या गणवेशात दिसून आले. या कारवाईत भदोही येथील जवान शरद उपाध्याय हे शहीद झाले तर पोलीस आणि डीआरजीचे दोन जवान जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने हेलिकॉप्टरद्वारे रायपूर येथे आणण्यात आले. तेथे सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. शहीद जवानाचा मृतदेह शासकीय इतमामात त्याच्या मूळगावी पाठवण्यात आला. या कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह मात्र हाती आले नाहीत, असेही चौहान यांनी सांगितले.
अनेक नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित भागात 24 एप्रिलरोजी सीआरपीएफच्या 74 व्या तुकडीवर सापळा रचून नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात 25 जवान शहीद झाले होते. त्याचा सूड घेण्याची योजना सुरक्षा दलाने तयार केली होती. त्याच योजनेची अमलबजावणी रविवारपासून करण्यात आली. आतापर्यंत पोलीस आणि सीआरपीएफने 17 नक्षलवाद्यांना अटक केली असून, कालच बुरकापाल येथे आठ नक्षलवादी जेरबंद करण्यात आले होते. अटकेतील या नक्षलवाद्यांनी बुरकापाल येथील माजी सरपंचाच्या हत्येसह सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यातदेखील सहभाग असल्याची माहिती सुरक्षा दलाच्यावतीने देण्यात आली.