मुक्ताईनगर- रस्त्यावरील ट्रक थांबवुन ट्रकवर दगडफेक करीत लुटीचा प्रयत्न करणार्या एकास मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली असून अन्य तीन संशयीत पसार झाले आहेत. तालुक्यातील सुकळी गावाजवळ रविवार, 26 ऑगस्ट रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास रस्ता लुटीचा प्रकार घडला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, तेलंगणा येथून सरकी घेवून हरीयाणाकडे जाणारा ट्रक (एच.आर.63 सी.7235) हा डोलारखेडा फाट्याकडून पुरनाड फाट्याकडे येत असतांना रविवारी रात्री 10.30वाजेच्या सुमारास रस्त्यावरील सुकळी गावाजवळ संशयीत आरोपी दिलीप बद्दु राठोड (19, रा.सुकळी ता. मुक्ताईनगर) सह अन्य तिघा अनोळखींनी ट्रकचा रस्ता अडवू चालक उदयसिंग जाट (रा.हरीयाणा) याच्याकडून पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला व ट्रकवर दगडफेक करून ट्रकच्या काचा फोडल्या होत्या. यात चालक जाट जखमी झाला होता. या प्रकरणी ट्रकचालकाच्या फिर्यादीवरून दिलीप राठोड व अन्य तिघांविरूद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत कडूकार करीत आहेत.