धुळे । शिदखेडा तालुक्यातील सुकवद येथे गेल्या एक महिन्यांपासून बिबट्यानी धूमाकूळ घातला होता. पुन्हा एकदा येथील परिसरात बिबट्याचा संचार असल्याची बाब समोर आली. येथील परिसरात वन विभागाने लावलेल्या कॅमेरात शनिवारी सायंकाळी व रविवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या कैद झाला आहे. दरम्यान, वनविभागाने येथील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सुकवद येथील आण्णा पाटील यांच्यावर 1 एप्रिल रोजी मोटरसायकलवर बिबट्याने हल्ला केला होता. त्या दिवसांपासून वन विभागाने या ठिकाणी कॅमेरा लावला होता. या कॅमेर्यात बिबट्या कैद झाला आहे.
वनविभागाचे कर्मचारी होते तैनात
शिंदखेडा तालुक्यातील सुकवद येथील तापी नदीच्या खोर्यात काटेरी झुडपात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार आहे. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सुकवद येथील ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली होती. त्यानुसार या भागात 3 एप्रिलपासून वन विभागाचे चार कर्मचारीही नियुक्त केली आले होती. तर चार ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून हा बिबट्या कुणालाही दिसला नाही. तसेच कॅमेर्यात कैद न झाल्यामुळे बिबट्या या भागातून गेला की काय? असे वाटत होते. मात्र, त्यानंतर वन विभागाने पुन्हा नव्याने दोन कॅमेरे बसविल्यामुळे शनिवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास व रविवारी पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास बिबट्या कैद झाला आहे