सुकाणू कसली; ही जीवाणू समिती!

0

मुंबई : शेतकर्‍यांसाठी एवढी मोठी कर्जमाफी केल्यानंतर कोणते राज्य जीवंत राहिले हे दाखवूनच द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विरोधकांना दिले. भाजप प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्द्यांवर सडेतोड मत व्यक्त करत, विरोधकांवर हल्ला चढविला. स्वामिनाथन आयोग 2014 पासून पडून होता, मग भाजप सत्तेत आल्यावरच तो आठवला कसा? फक्त विरोधकच नाही तर विरोध करणार्‍या समित्यांनाही मुख्यमंत्र्यांनी टार्गेट केले. जणू काही नरेंद्र मोदींनीच स्वामिनाथन आयोग आणला आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. शेतकरी सुकाणू समितीचा उल्लेख त्यांनी जीवाणू समिती असा करत मला कोणाची औकात काढायची नाही, असेही ते म्हणाले. केवळ अराजकता माजवण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीची आंदोलकांकडून मागणी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हे आधीच्या सरकारसारखे बेईमान सरकार नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

यांना अराजकता माजवायची आहे
मुख्यमंत्री म्हणाले, जे लोक निवडूनही येऊ शकत नाहीत ते या समितीत आहेत. पण त्यांना कधी विरोध केला नाही. मात्र संपूर्ण कर्जमाफीची मागणी करून यांना अराजकता माजवायची आहे. त्यांना फक्त लोकांना झुंजवत ठेवायचे होते. 15 ऑगस्टला झेंडा फडकवण्यास विरोध करणारे हे देशद्रोही आहेत, अशा शब्दांत टीका करत मला कोणाची औकात काढायची नाही. या शेतकरी आंदोलनामागे केवळ राजकीय हेतू होता, असा आरोपही त्यांनी केला. इतकी वर्षे झोपले होते का? विरोधी पक्षांवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, आघाडी सरकारने खोदलेले खड्डे आम्ही बुजवत आहोत. विरोधकांच्या आंदोलनात कार्यकर्तेही दिसत नाहीत. स्वामिनाथन आयोग लागू करण्याची मागणी विरोधक करत आहेत. परंतु, 2004 सालीच स्वामिनाथन यांनी आपला अहवाल सादर केला होता. इतके वर्षे यांची सत्ता होती. मग, 2014 मध्येच तुम्हाला जाग आली का, इतकी वर्षे तुम्ही झोपले होते का? असा सवालसह त्यांनी उपस्थित केला.

केंद्रात जात नाही तोपर्यंत मीच मुख्यमंत्री!
खा. रावसाहेब दानवे यांच्या सततच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून नारळ देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवेंना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवणार नाही असे सांगत दानवेंची गच्छंती केली जाणार असल्याच्या वृत्तांना पूर्णविराम दिला. सोबतच आपण दिल्लीला जाण्याची तुर्तास शक्यता नसून, दिल्लीला जात नाही तोपर्यंत मीच मुख्यमंत्री असेन, असेही स्पष्ट केले. या देशात जर कोणी परिवर्तन घडवू शकते, तर ते नरेंद्र मोदी घडवू शकतात असा लोकांना विश्वास आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेली राजकीय व्यवस्था मोदींनी बदलली. विकसित भारतचे स्वप्न फक्त मोदीच पूर्ण करु शकतात. लोकांमध्ये विश्वास निर्माण केला तर भाजपला कधीच पराभवाचे तोंड पहावे लागणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी विरोधकांच्या संघर्ष यात्रेवरही कडाडून टीका केली. एकही ठिकाणी हजार लोक जमा करु शकले नाहीत. त्यांचा संघर्ष एकमेकांसोबत होता. त्यांचेच प्रतिनिधी लोक आणण्यासाठी भांडत होते असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. आमचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढली होती. 1000 लोकसंख्या असलेल्या ठिकाणीही 900 लोक यात्रेत सहभागी असायचे, अशी आठवण त्यांनी विरोधकांनी करुन दिली.