नाशिक : राज्यभरातील शेतकर्यांच्या विविध संघटनांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या शेतकर्यांच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीचा बाजार उठला आहे. या समितीत फूट पडली असून, औरंगाबादच्या काही नेत्यांनी बैठकीत मोर्चाची हाक दिल्याने नाशकातील संयोजन समिती पदाधिकार्यांनी पत्रकार परिषदेतच काल समिती विसर्जित करण्याची घोषणा केली. अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथून 1 जून 2017 रोजी शेतकरी संपाचे हत्यार उपसण्यात आले होते. यात नाशकातील शेतकर्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. शहरातून जाणारा शेतीमाल थांबवण्यासाठी छेडलेल्या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या आंदोलनानंतर 5 जूनरोजी नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित शेतकरी मेळाव्यात नाशिकच्या संयोजन समितीने सुकाणू समितीची निर्मिती केली होती.
संपाचा इशारा शेतकरीविरोधी!
संपूर्ण कर्जमाफी व शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी विविध पक्षांतील पदाधिकार्यांनी एकत्रित येऊन नाशिक येथे स्थापन केलेली राज्यस्तरीय सुकाणू समिती विसर्जित करण्यात आल्याची घोषणा नाशिक जिल्हा संयोजन समितीच्यावतीने हंसराज वडघुले व अमृता पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. इतकेच नव्हे, तर सुकाणू समितीच्या माध्यमातून काही लोकांनी औरंगाबादेत बैठक घेऊन 1 मार्च 2018 रोजी संपाचा दिलेला इशारा मान्य नसल्यातेदेखील बैठकीत सांगण्यात आले. वडघुले व पवार म्हणाले, मूळ संयोजन समिती, जनाधार नसलेले नेते, शेतीप्रक्रियेबाबत माहिती नसलेल्या ठराविक लोकांनी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता औरंगाबाद येथे समितीच्या नावाने 1 मार्च 2018 पासून पुन्हा संपाची हाक दिली आहे. याच काळात शेतकर्यांची द्राक्षे, कांदा, ऊस, टोमॅटो, भाजीपाला विक्रीसाठी बाजारात येणार आहे. यात शेतकर्यांचे नुकसान होणार असल्याने 1 मार्चच्या संपात सहभागी होऊ नये, असे आवाहन दोघांनी केले.