सुकीवरील नवीन पुलावरून वाहतूक सुरु

0

निंभोरा। येथील बहुप्रतीक्षित सुकी नदीवरील नवीन पुलावरून गेल्या आठवड्यापासून वाहतूक सुरु झाली आहे. यामुळे निंभोर्‍याहून सावदा जाताना तब्बल आठ किलोमीटरचा फेरा वाचणार आहे. सर्वाधिक महत्वाचे पावसाळ्यात शेतकर्‍यांचे होणारे हाल थांबणार आहेत.सन 2006 मधील अतिवृष्टीत निंभोरा येथील सुकी नदीवरील पूल वाहून गेला होता. यामुळे वाहतूक विस्कळीत होवून शेतकरी त्रस्त होते. हा पुलाचे काम व्हावे, यासाठी तत्कालिन खासदार विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांनी पुढाकार घेत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून नवीन पूल जोडरस्ता असे मिळून सुमारे साडेचार कोटींचे काम मंजूर करून आणले होते.

पावसाळ्यापूर्वी समस्या सुटल्याने दिलासा
विशेष म्हणजे माजी मंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, जनसंग्रामचे विवेक ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्या पूनम दुर्गादास पाटील आणि ग्रामपंचायतीने सुद्धा नवीन पुलासाठी वारंवार पाठपुरावा केला. सन 2013 पासून पुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र, मध्यंतरी निधीची अडचण आल्याने काम रखडले होते. असे असले तरी गेल्या वर्षभरापासून पुलाच्या कामाने गती घेतली. सध्या हे काम पूर्णत्वास असून गत आठवड्यापासून पुलावरून वाहतूकदेखील सुरू झाली आहे. ऐन पावसाळ्यापूर्वी ही समस्या सुटल्याने परिसराला दिलासा मिळाला आहे.

130 मीटर लांब आणि 20 मीटर मोरी, 3 मीटर उंची आणि 26 गाळे असलेल्या पुलासाठी 2 कोटी 42 लाख, तर निंभोरा ते वाघोदा या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी 1 कोटी 86 लाखांचा निधी मंजूर आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्णत्वास आलेल्या या पुलामुळे 29 गावांचा फेरा वाचणार आहे.