सुजयला राष्ट्रवादीकडून लढण्याचा राहुल गांधींचा सल्ला धक्कादायक होता: राधाकृष्ण विखे पाटील

0

अहमदनगर:कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेस अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे अशी माहिती दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली होती. दरम्यान नगरच्या जागेसंदर्भात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीच सुजय विखेंना काँग्रेसऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्याचा धक्कादायक सल्ला दिला, असा खळबळजनक खुलासा राधाकृष्ण विखे पाटील केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत खुलासा केला. विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा राहुल गांधींनी स्विकारल्यानंतर आता हा खुलासा करण्याची योग्य वेळ असल्याचे सांगत त्यांनी मनातली खदखद बोलून दाखवली. साडेचार वर्षे विरोधीपक्ष नेतेपद सांभाळण्याचं फलीत काय तर काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीकडून लढण्याचा सल्ला मिळणे दुर्देवी होते, असेही ते यावेळी म्हणाले.

नगरमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार सलग तीनदा पराभूत झाला होता, म्हणून ही जागा काँग्रेसला सोडावी अशी आमची मागणी होती. निवडून येण्याची क्षमता असल्याने डॉ. सुजय विखेंना उमेदवारी द्यावी असा आमचा आग्रह होता. यासाठी मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करीत असतानाच शरद पवार यांनी त्याचवेळी पत्रकार परिषद घेतली आणि आमचे वडील बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. पवारांकडून आमच्या वडिलांबाबत केले गेलेले वक्तव्य मनाला वेदना देणारे होते. पवारांच्या या पत्रकार परिषदेनंतर डॉ. सुजय विखेंनी तडकाफडकी भाजपात जाण्याची घोषणा केली. नगरची जागा काँग्रेसकडे येऊ नये यासाठी पक्षातूनच काही जणांनी प्रयत्न केले असल्याचे आरोप विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केले.