सुझलॉन कंपनीविरोधात आदिवासींचा एल्गार

0

नंदुरबार। धुळे-मौजे काळटेक, पचाळे, सिंदबन गृप ग्रामपंचायत हद्दीतील अनुसूचित क्षेत्रात वनविभागामध्ये सुझलॉन कंपनीने उभारलेल्या टॉवरच्या पवनऊर्जा विद्युत वाहिनीतील शॉर्ट सर्कीटमुळे 72 हेक्टर वनजमीनीपैकी 70 ते 80 टक्के वनक्षेत्र जळून खाक झाले आहे. झालेली नुकसान भरपाई मिळावी आणि जळीत जंगलातील वनसंवर्धनाचे काम पुन्हा नव्याने हाती घ्यावे व अन्यायग्रस्त आदिवासी बांधवांना न्याय देण्यासाठी सुझलॉन कंपनी शाखा छडवेल कोर्डे, हायवे क्र.6, अमरधाम येथे दि.21 एप्रिल 2017 शुक्रवार रोजी सकाळी 11 डोंगर्यादेव माऊली संघर्ष समिती नंदुरबार व आदिवासी बहुल धुळे-नंदुरबार परिसरातील बांधवांतर्फे रास्तारोको व ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी निजामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अर्जुन पटले यांच्यामार्फत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर लगेच सुझलॉन कंपनी शाखा छडवेल येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाला निवेदन देवून आंदोलन मागे घेण्यात आले.

संयुक्त बैठक बोलविण्याचे आश्‍वासन
अनुसूचित वनक्षेत्रात वन संवर्धन होण्यासाठी वनझाडे लावणे सुझलॉन कंपनीला बंधनकारक असतांना कोणत्याही प्रकारे वनवृक्ष लागवड केलेली नाही. व अनुसूचित क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कंपनीमार्फत रोजगार उपलब्ध करुन दिलेला नाही. आरोग्य व शिक्षणाबाबत आदिवासी क्षेत्राला कोणताही लाभ मिळत नाही. या विरोधात सुझलॉन कंपनीविरुद्ध रास्तारोको आंदोलन व ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी पिंपळनेरचे अप्पर तहसीलदार यशवंत सुर्यवंशी यांनी आंदोलनकर्त्यांना भेट दिली. यावेळी त्यांनाही आंदोलनकर्त्यांतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका प्रशासनाने वनविभाग, सुझलॉन कंपनी आणि आदिवासी आंदोलनकर्ते प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलविण्याचे आश्‍वासन दिले. आंदोलनात अनुसूचित क्षेत्र गटनेता दिलीप बागूल, डोंगर्यादेव माऊली संघर्ष समितीचे महासचिव राजेंद्र पवार, संस्थापक अध्यक्ष वासुदेव गांगुर्डे, दिलीप थैल, मांगीलाल जगताप, जगन जगताप, महेंद्र जगताप, विमलबाई जगताप, नर्मदाबाई सुर्यवंशी, निलाबाई गांगुर्डे, सागर साबळे तसेच बहुसंख्य आदिवासी पुरुष व महिला व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या
मौजे काळटेक, पचाळे, सिंदबन गृप ग्रामपंचायत हद्दीतील शेवगा गड परिसरातील 72 हेक्टर वन संवर्धन झालेल्या पवनऊर्जा विद्युत वाहिनी शॉर्ट सर्कीटमुळे लागलेल्या आगीतील शंभर टक्के नुकसान भरपाई ग्राम पंचायतीतील सहभागी आदिवासी कुटूंबांना देण्यात यावी. शेवगा गड परिसरातील जळीत वनक्षेत्रावर 3ः2 या प्रमाणात तीन वनफळ झाडे व दोन वनझाडे यानुसार सुझलॉन कंपनीने नव्याने वनसंवर्धन करावे आणि आदिवासी समाजाचे निसर्ग कुलदैवत डोंगर्‍यादेवाचे श्रध्दास्थान असलेल्या शेवगा गडाला आदिवासी संस्कृती दर्शक कमान दरवाजा बांधण्यात यावा. अनुसूचित वनक्षेत्रात जास्तीत जास्त वनफळ झाडांची लागवडीकरीता गावनिहाय प्रती कुटूंब किमान 5 वनझाडांचे रोपे दरवर्षी पुरविण्यात यावेत. उदा.महु, बेहडा, आवळा, हिरडा, चिंच, जांभुळ, बोर, सिताफळ, आंबा, काजु, टेंभुर्णी, लिंब इत्यादी अनेक वनफळ झाडांची लागवडीसाठी सुझलॉन कंपनीने वनवृक्ष रोप आदिवासी कुटूंबांना देण्यात यावेत. आणि वन संवर्धनाची जबाबदारी आदिवासी समाजाला फळ व फुलाचे शंभर टक्के उत्पन्न अबाधित करावे.

अनुसूचित क्षेत्रातील सुरक्षा एजन्सी आदिवासी लाभ धारकांना सुझलॉन कंपनीने रोजगारासाठी कायमस्वरुपी देण्यात यावी. धुळे/नंदुरबार आदिवासी बहुल जिल्ह्यातील सुझलॉन कंपनीत 80 टक्के कुशल व अकुशल आदिवासी कामगारांची नोकरभरती त्वरीत लागू करावी. सुझलॉन कंपनीने अनुसूचित क्षेत्रात वहिवाटीकरीता ज्या आदिवासी शेतकर्यांची शेतजमीन वहिवाट रस्ता तयार केलेला आहे, अशा आदिवासी शेतकर्‍यांच्या वारसांना दरमहा 5 हजार रुपये पीक उत्पन्न नुकसान भरपाई त्वरीत लागू करावी यासह एकूण 12 मागण्या करण्यात आल्या आहेत.

हजारो झाडांची कत्तल
धुळे-नंदुरबार आदिवासी बहुल जिल्ह्यात सुझलॉन कंपनीमार्फत पवनऊर्जा प्रकल्प गेल्या बारा वर्षापासून सुरु आहे. सदर प्रकल्प आदिवासी बहुल जिल्ह्यातील आदिवासींचे शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत कंपनीने आश्‍वासित केलेले आहे. पवनऊर्जा प्रकल्प सुरु होतांना मोठ्या प्रमाणावर वनजमीनीसह आदिवासी शेतकर्यांच्या शेतजमीनीतील वहिवाट रस्ता, विद्युत वाहिनी पिंजरा व पोल करीता आदिवासी शेतकर्यांची शेतजमीनी विना मोबदला हस्तांतरीत झालेली आहे. आदिवासी समाज भोळाभाबडा असल्याने बर्याच आदिवासी शेतकर्यांच्या शेतजमीनीवर विना परवानगीने जबरदस्तीने टॉवर उभारणी करुन अनुसूचित वनक्षेत्रावर टॉवर उभारणी करतांना व वहिवाट रस्ता तयार करतांना आदिवासी समाजाच्या रोजी-रोटीचा भाग असलेल्या हजारो झाडांची कत्तल केलेली आहे.