सुटीतल्या पर्यटकांसाठी ‘अक्सा बीच’ ठरतोय‘हादसा बीच’

0

मुंबई । मुंबईसह आसपासच्या भागातील नागरिकांसाठी समुद्रसहलीसाठीचे एक चांगले ठिकाण असलेला ‘अक्सा बीच’ उन्हाळी सुट्टीत येथे गर्दी करणार्‍या पर्यटकांसाठी ‘हादसा बीच’ ठरू पाहात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या समुद्रकिनारी होणार्‍या अपघातांच्या घटना जास्त असतानाही या ठिकाणी आजही पुरेशी सुरक्षाव्यवस्था करण्यात आलेली नाही. सध्याच्या सुट्टीच्या हंगामात या ठिकाणी दररोज शेकडो पर्यटक येत असतानाही संपूर्ण किनार्‍यावरील सुरक्षेची जबाबदारी अवघ्या आठ जीवरक्षकांवर आहे. अनेकदा उत्साही पर्यटक समुद्रात खोलवर जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु, त्यांना अडवणार्‍या जीवरक्षकांनाच पर्यटकांच्या अरेरावी वा वादावादीला तोंड द्यावे लागत आहे.

गेल्या दोन दशकात येथे 80 जणांचा बुडून मृत्यू
अक्साचा किनारा धोकादायक म्हणून ओळखला जातो. 1999 पासून आजपर्यंत येथे 80 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. 9 जुलै 2000 रोजी या ठिकाणी मालाड (पूर्व) येथील 12 तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. 2016ला बुडणार्‍या 45 जणांना जीवरक्षकांनी वाचवले आहे. त्यात तीन जण आत्महत्या करण्यासाठी आले होते. गेल्या दोन महिन्यांत येथे बुडण्याच्या अनेक घटनांची नोंद झाली आहे. सुमारे तीन किलोमीटर पसरलेल्या इथल्या किनार्‍यावर पोहणे धोकादायक असल्याने तो ‘हादसा बीच’ म्हणूनच ओळखला जातो.

विकेंडला चार ते पाच हजार पर्यटक येथे हजेरी लावतात
उन्हाळ्यात मोठया संख्येने पर्यटकांनी हा किनारा गजबजतो. सुट्टीत शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी चार ते पाच हजार पर्यटक येथे हजेरी लावतात. तर उर्वरित दिवशी एक ते दोन हजार पर्यटक हमखास या समुद्रकिनारी पाहायला मिळतात. मात्र सध्या या ठिकाणी चार पाळ्यांमध्ये केवळ आठ जीवरक्षक कार्यरत आहेत. पर्यटकांची वाढलेली संख्या लक्षात घेता आठ जीवरक्षक अपुरे आहेत.

पर्यटकांना आवरताना नाकीनऊ
अतिउत्साही पर्यटकांना आवरताना जीवरक्षकांना नाकीनऊ होते. अनेकदा पर्यटक व जीवरक्षक यांच्यात खटकेही उडतात. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस दलातील एक अधिकारी सहकुटुंब अक्सा समुद्रकिनारी फिरायला आले होते. समुद्राला भरती असून पोहण्यासाठी जाऊ नका, अशी सूचना जीवरक्षकाने केली. तरीही त्यांचे न ऐकता ते पोहण्याकरिता पाण्यात उतरले. त्याच वेळी भरती आल्याने ते चारही बाजूने पाण्याने घेरले गेले. त्या वेळी जीवरक्षकाने दीड किलोमीटर आत पाण्यात जात त्यांचे प्राण वाचवले.