श्रीनगर : बंदुकीच्या गोळ्यांनी छिन्नविछिन्न झालेल्या लष्करी जवानाचा मृतदेह काश्मीरमधील शोपियनमध्ये सापडला. इरफान अहमद दार असे या जवानाचे नाव असून दहशतवाद्यांनी इरफानची अतिशय निर्घृणपणे हत्या केली आहे. इरफान उत्तर काश्मीरमधील गुरेझ व्हॅलीमध्ये कर्तव्य बजावत होता. दहा दिवसांच्या सुट्टीवर असलेला इरफान कालपासून बेपत्ता होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह शोपियनमध्ये सापडला. त्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. जवानाची हत्या करण्यात आल्याच्या वृत्ताला शोपियनच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी दुजोरा दिला. अहमद दारचा मृतदेह केगाम भागातील वोथमुलामध्ये आढळून आला. त्याचा मृतदेह घरापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आढळून आला. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला.