चोपडा । आपण मंत्रीमंडळात असतांना राज्यातील सूतगिरण्यांना प्रति चाते तीन हजार रुपये बिन व्याजी कर्ज देण्याच प्रस्ताव मंजूर केला. परंतु त्यावर गेल्या दिड वर्षात कोणतीच सकारात्मक हलचाल झाली नाही. सूतगिरण्या खुप अडचणीतून चालत आहेत. त्यांना शासनाने मदत करणे खुपच गरजेचे आहे. तरच या सामान्य माणसास न्याय देणारे प्रकल्प सशक्तपणे चालतील. तरच त्यांना अच्छे दिन येतील. संपूर्ण जिल्ह्यात सूतगिरण्या बंद पडल्याचे चित्र असतांना चोपडा सूतगिरणी चेअरमन कैलास पाटील यांच्या नेतृत्वात उत्तम, कौतुकास्पद कार्य करीत असल्याचा आनंद वाटतो, असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.
जिल्ह्याला विकासाची गरज -आ. खडसे
यावेळी माजी मंत्री खडसे म्हणाले की, जिल्ह्याचा विकास गेल्या काही कालखंडात स्थिरावला आहे. तापी नदीवरील पाडसरे धरणाला पैसा देण्याची भूमिका आपली होती. परंतु विकासात आपला अडसर वाटल्याने आपल्याला लांब ठेवले जात आहे, असा तडाखा त्यांनी मारला. परंतु जिल्ह्यातील सहकारी प्रकल्प सुरु रहावेत त्यामुळे सुबत्ता यावी म्हणून जिल्हा बॅकेच्या माध्यमातून आपण सहकार्याची भूमिका घेतली आहे. चोपडा सूतगिरणीच्या कर्ज प्रस्तावाला पाठिंबा दिला. चोसाका बाबत मात्र कागदपत्रांच्या अडचणींमुळे नाईलाज असल्याचे खडसे म्हणाले.
यांची होती उपस्थिती
दरम्यान प्रारंभी सूतगिरणीचे चेअरमन माजी आमदार कैलास पाटील यांनी प्रकल्पाचा आढावा सादर करून नाथाभाउ सरकारात नसल्याने जिल्ह्याचा विकास खुंटला असल्याचे सांगितले. खडसे मंत्रीमंडळात जावेत म्हणून कार्यकर्त्यांनी दबावतंत्र वापरावे असे आवाहन केले. याप्रसंगी चोसाका चेअरमन अतुल ठाकरे, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र पाटील, सूतगिरणी संचालक जागृती बोरसे, प्रा.भरत पाटील, नगरसेवक गजेंद्र जायसवाल,जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे, सुनिल सोनगिरे, राकेश पाटील, डॉ.व्हिकी सनेर, मिलिंद पाटील, किशोर दुधाने, पंकज पाटील, रावसाहेब पाटील, प्रवीण पाटील आदी हजर होते.
यांनी दिली भेट
तालुक्यात एका कार्यक्रमासाठी खडसे आले असता त्यांनी चोपडा तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर भेट दिली. त्यांच्या सोबत खासदार रक्षा खडसे, माजी जि.प.अध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रा.सुनिल नेवे, भाजपचे नेते घनःश्याम अग्रवाल, पं.स.सभापती आत्माराम म्हाळके, माजी जि.प.सदस्य शांताराम पाटील, भाजप ओबिसी विभागाचे नाशिक विभागीय अध्यक्ष प्रदीप पाटील उपस्थित होते. त्यांचे स्वागत माजी आ.पाटील, शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख इंदिराताई पाटील, तुकाराम पाटील, श्रीकांत नेवे, शशीकांत पाटील, एम.डी.मांतेश महाजन यांनी केले.