नवी दिल्ली: सुदानमध्ये फॅक्ट्रीत झालेल्या स्फोटात १८ भारतीयांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुदानमधील सस्लूमी येथे हा स्फोट झाला आहे. त्यात एकूण २३ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या स्फोटात १३० लोक जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. अचानक झालेल्या या स्फोटामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सलुमी येथील फॅक्ट्रीत स्फोट झाल्यानंतर सुदानच्या दुतावासानेही एक निवेदन जारी करून त्याबाबतची माहिती दिली आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार सध्या ७ भारतीय कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर या स्फोटात बचावलेल्या ३४ भारतीय कामगारांना सलुमी सिरामिक फॅक्ट्री रेसिडेन्समध्ये ठेवण्यात आले आहे. स्फोटानंतर फॅक्ट्रीतील १६ भारतीय कामगार बेपत्ता असल्याचंही सांगण्यात येतं. त्यामुळे या कामगारांचं काय झालं? हे कामगार सुद्धा आगीत होरपळले का? असे प्रश्न विचारले जात आहेत. या घटनेबाबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट केलं आहे. सुदानची राजधानी खार्तुममधील सलुमी फॅक्ट्रीत स्फोट झाल्याची माहिती आहे. त्यात काही भारतीय कामगारांचा मृत्यू झाला असून काही कामगार गंभीररित्या जखमी आहेत. ही वेदनादायी घटना आहे, असं जयशंकर यांनी म्हटलं आहे.
जयशंकर यांनी भारतीयांसाठी एक आपत्कालीन नंबर जारी केला असून हा नंबर चोवीस तास कार्यरत राहणार आहे. भारतीय दुतावासातील प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले आहेत. दुतावासाने +२४९-९२१९१७४७१ हा आपत्कालिन क्रमांक जारी केला आहे. या शिवाय दुतावासाकडून सोशल मीडियावरही माहिती दिली जात आहे. कामगारांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, असं जयशंकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.