सुदृढ, सक्षम लोकशाही असल्यास देशाच्या विकासाला मिळेल गती

0

प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर : श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीत मतदार नोंदणी अभियान

भुसावळ- भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असलेला देश असून ही लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तरुणांचे योगदान महत्त्वाचे आहे. कारण लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तरच देशाच्या विविधांगी विकासाला गती मिळते. तरुणांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करावे. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाने मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन भुसावळचे प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांनी येथे केले. शहरातील संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात बुधवारी मतदार जनजागृती अभियानांतर्गंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी निवडणूक प्रक्रिया महत्त्वाची
प्रांत डॉ.चिंचकर पुढे म्हणाले की, लोकशाही बळकट करण्यासाठी भारतीय राज्यघटनेनुसार निवडणूक प्रक्रियेला अतिशय महत्व आहे. या परीवर्तनीय प्रक्रियेतील प्रत्येक मतदार लोकशाहीतील महत्त्वाचा घटक आहे. यासाठी 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नवमतदाराने मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करून घ्यावे. इतरांना देखील त्यासाठी प्रोत्साहन द्यावे. ‘सक्षम करु या युवा’ हे घोषवाक्य घेऊन संपूर्ण देशभर मतदार जागृती अभियान सुरू असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

यांची होती उपस्थिती
नायब तहसीलदार संजय तायडे, डी.पी.सपकाळे, विजय भालेराव, योगेश मुस्कावत, प्रा.डॉ. पंकज भंगाळे, प्रा.डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.सुधीर ओझा, प्रा.अविनाश पाटील, प्रा.अजित चौधरी, प्रा.दिनेश पाटील, प्रा.धीरज पाटील उपस्थित होते.