ठाणे । ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते सुधीर दळवी यांना जनकवी पी. सावळाराम तर ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेत्री जयश्री टी. यांना यंदाचा गंगाजमुना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ही घोषणा केली तसेच प्रसिध्द दिग्दर्शक रवी जाधव, प्रसिध्द साहित्यिक अरुण म्हात्रे, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या आदर्श शिक्षिका माधुरी ताम्हणकर यांनाही जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. येत्या 17 डिसेंबर रोजी गडकरी रंगायतनमध्ये या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. यावर्षी या पुरस्काराचे हे 18 वे वर्ष आहे. जनकवी पी. सावळाराम कला समितीच्या वतीनं संगीत, चित्रपट, साहित्य, नाट्य, कला आणि शिक्षण क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणार्या गुणिजनांना जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित केले जाते.
अभिनेत्री जयश्री टी. यांना गंगाजमुना पुरस्कार
मराठी रंगभूमीसह हिंदी चित्रपट, मालिका आणि विविध भाषांतील चित्रपटातही सुधीर दळवी यांनी भूमिका साकारल्या आहेत. शिर्डी के साईबाबा या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. सुमारे 60 हून अधिक मराठी चित्रपट, 200 हून अधिक हिंदी चित्रपट, मालिका त्यांच्या नावावर जमा आहेत. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना 51 हजार रूपये रोख आणि सन्मानचिन्ह, असा पुरस्कार दिला जाणार आहे. गेली दोन दशकं लावणी क्षेत्रात आपल्या भन्नाट नृत्य आणि अभिनय शैलीचा ठसा उमटवणार्या अभिनेत्री जयश्री टी. यांना 51 हजार रूपये रोख आणि स्मृतिचिन्ह असा गंगाजमुना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अरूण म्हात्रे यांना साहित्य, माधुरी ताम्हणकर यांना शैक्षणिक क्षेत्र, तर प्रसिध्द दिग्दर्शक रवि जाधव यांना लक्षवेधी कलाकार म्हणून 21 हजार रूपये रोख आणि स्मृतिचिन्ह असा पुरस्कार दिला जाणार आहे.