मुंबई । पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे 2017 चा दया पवार स्मृती पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समकालीन भारतीय चित्रकार सुधीर पटवर्धन आणि ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या कादंबरीची नव्या पिढीची दमदार लेखिका शिल्पा कांबळे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा बुधवार, 20 सप्टेंबर 2017 रोजी नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका सभागृहात सायंकाळी 6.0 वाजता होणार आहे. यंदाचा हा एकविसावा पुरस्कार सोहळा असून प्रत्येकी दहा हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दया पवार पुरस्कारांबद्दल माहिती देताना प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा पवार यांनी सांगितले की, या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ पत्रकार-लेखक कुमार केतकर यांच्या हस्ते होणार असून लेखक संजय पवार आणि चित्रकार सुधाकर यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी अरूण म्हात्रे करणार आहेत.
आजवरचे पुरस्काराचे मानकरी
आतापर्यंत पुरस्काराने प्रेमानंद गज्वी, उत्तम कांबळे, प्रकाश खांडगे, हिरा बनसोडे, गंगाधर पानतावणे, विठ्ठल उमप, रझिया पटेल, जयंत पवार, दिनकर गांगल, वामन केंद्रे, लक्ष्मण गायकवाड, उल्का महाजन, ज्योती लांजेवार, उर्मिला पवार, संजय पवार, गझलकार भीमराव पांचाळे, डॉ.जब्बार पटेल, शाहीर संभाजी भगत, लोकनाथ यशवंत, प्रतिमा जोशी, भीमसेन देठे आणि नागराज मंजुळे, सुषमा देशपांडे, वीरा राठोड, सुधारक ओलवे, गणेश चंदनशिवे आदी मान्यवरांना गौरविण्यात आले आहे.
विचारवंतांचा सत्कार
समकालीन भारतीय चित्रकलेमध्ये सुधीर पटवर्धन हे एक महत्त्वाचे चित्रकार मानले जातात. एक समाजाभिमुख कलावंत म्हणून त्यांची ओळख आहे. महानगरी जीवनजाणिवांचा तसेच कामगार, कष्टकरी, वंचितादी सर्वसामान्य माणसांचा त्यांनी त्यांच्या अनोख्या चित्रशैलीतून सातत्याने वेध घेतलेला आहे. कवी आणि कलासमीक्षक रणजीत होस्कोटे यांनी पटवर्धन यांच्या कामावर दोन पुस्तके The Complcit Observer (2004), The Crafting of Reality (2007) लिहिली आहेत. ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या आपल्या पहिल्याच कादंबरीने साहित्य वर्तुळात ठसा उमटविणार्या शिल्पा कांबळे या आयकर विभागात अधिकारीपदावर कार्यरत असून त्यांच्या या कादंबरीला पूर्वी सुभाष भेंडे नवोदित लेखक वाडंमय पुरस्कार, अश्वघोष पुरस्कार आणि सावित्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुक्त शब्द, अनुष्टुभ मासिकांमद्ये शिल्पा कांबळे यांच्या अनेक कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.