सुनसगाव नदी पात्रातून नियमबाह्य गौण खनिजाचे उत्खनन

0

पर्यावरणप्रेमी संतप्त : दोषींवर कारवाई न केल्यास प्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा

वरणगाव- जवळच असलेल्या जुनोना शिवारात धरणाच्या कामासाठी लागणार्‍या जाड वाळूचे उत्खनन सुनसगाव येथील वाघूर नदीपात्रातून रीतसर उत्खननाचा परवाना काढून होत असलेतरी पोकलॅण्ड व जेसीबीला नदीपात्रात उत्खनाची परवानगी नसतानाही नियम सर्रास धाब्यावर बसवले जात असल्याने पर्यावरणप्रेमी संतप्त झाले आहेत. रात्री गौण खनिजाच्या वाहतुकीला परवानगी नसतानाही येथे मात्र नियमांना केराची टोपली दर्शवण्यात आली असून महसूल व परीवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचा उघड आरोप नागरीक करीत आहेत.

धरणाच्या कामासाठी उत्खनन
जुनोने शिवारात दीपनगर प्रकल्पासाठी आणि परीसरातील शेतकर्‍याच्या शेतातील विहिंरींना पाणी यावे, शेतजमिनी पाणीदार बागायती व्हाव्यात या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाने ओझरखेडा धरणाच्या अधिक पट मोठ्या धरणाच्या बांधकामाला जुनोने शिवारात सन 2017 मध्ये सुरुवात केली आहे. धरणातील बांधकामाच्या विशिष्ट भागात रेवटा (जाड रेती) वापर करण्यात येत आहे आणि ती रेती अंदाजे 20 हजार घन मीटर ग्रॅव्हल लागणार आहे. जाडरेती (रेवटा) वाघूर नदीपात्रातून सुनसगाव, बेळी शिवार येथून उचल करून वाहतूक करण्याचा जळगावच्या एका कन्स्ट्रक्शनला देण्यात आला आहे. वाहतूक आणि उत्खननाचा संबधीत कंत्राटदाराने महसूल विभागाकडून परवाना घेतला असलातरी परवान्याचे उल्लंघण करून परवान्यापेक्षा अधिक उत्खनन व वाहन क्षमतेपेक्षा अधिक भाराने वाहतूक रात्रं-दिवस सर्रास केली जात आहे. कंत्राटदाराला दिलेल्या परवान्यात जेसीबी किंवा पोखलॅण्डचा वापर उत्खननासाठी करता येणार नाही, अशी अटक असून कोणताही रहदारीचा पुल किंवा धरण, बंधार्‍याच्या सुरक्षा क्षेत्रात 500 मीटर जवळपास उत्खनन करता येणार नाही, अशी लिखीत अट व तंबी दिली असताना कंत्राटदाराने नियम पायदळी तुडवले आहेत शिवाय पूल आणि धरणाजवळ उत्खनन सुरू आहे. वाहतूक करतांना वाहुन नेत असलेला माल ताडपत्रीने झाकून न्यावा या संदर्भातील 28 नियम असुन त्यातून एक दोन सोडले तर सर्वच नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप आहे. परवान्यातील नियमांचे उल्लंघण, कोणत्याही अटी-शर्तीचा भंग केल्यास प्रशासनाला कारवाईचे अधिकार आहेत त्यामुळे आता महसूल प्रशासन कारवाई करणार की कंत्राटदाराची पाठराखण करणार? असा प्रश्‍न पर्यावरणप्रेमी उपस्थित करीत आहेत.