मुंबई । सुनिल स्पोर्ट्स क्लबने आर्य सेवा मंडळाने आयोजित केलेल्या प्रथम श्रेणी पुरुष गट कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला तो सुनीलचा रोहन जाधव. रोहनला रोख दोन हजार रुपये देऊन गौरवण्यात आले. ताडदेव-आर्य नगर येथील आर्य मंडळाच्या क्रीडांगणावर झालेल्या अंतिम सामन्यात सुनिलने शिवशक्तीचा 33-17 असा सहज पराभव करीत हिंदू हृदयसम्राट चषक व रोख आठ हजार रुपयांचा पुरस्कार आपल्या नावे केला. पराभूत शिवशक्ती संघालामीनाताई ठाकरे चषक व रोख सहा हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत सुनिलने शिवशक्तीवर पहिला लोण देत आघाडी घेतली. हळूहळू ती वाढवित नेली. विश्रांतीला त्यांच्याकडे 14-05अशी भक्कम आघाडी होती.
विश्रांतीनंतर सुरू झालेल्या खेळात त्यांनी पुन्हा एकदा शिवशक्तीवर लोण देत आपली आघाडी वाढवित नेली. हा दुसरा लोण देते वेळी शिवक्तीच्या शिलकी 4खेळाडूंना सुनिलच्या शोहेब मुल्लाने आपल्या एकाच चढाईत टिपत हा लोण देण्यात सिहाचा वाटा उचलला. मुल्लाला या विजयात चढाईत रोहन जाधव तर पकडीत चेतन गायकवाडची मोलाची साथ लाभली. पूर्वार्धात शिवशक्तीकडून म्हणावा तसा प्रतिकार झाला नाही.