सुनेच्या खूनप्रकरणी सासर्‍याला जन्मठेपेची शिक्षा

0

जळगाव : माहेरुन उसनवारीचे 10 हजार रुपये सुनेने आणले नाही म्हणुन सासर्‍याने कुर्हाडीने वार करून सुनेचा खून केला होता. या खटल्यात जिल्हा न्यायालयातील न्या.ए.के.पटणी यांच्या न्यायालयाने सासर्‍यास सोमवारी दोषी धरले होते. यानंतर मंगळवारी न्या. पटणी यांनी सुनेच्या खूनप्रकरणी सासर्‍यास जन्मठेपेची शिक्षा सुनाविली आहे. काळू रामू मांडवलकर (वय 72 रा.पाळधी ता. धरणगाव) हे संशयित आरोपीचे नाव आहे.

पाळधी येथील साई मंदिराजवळ मे 2015 मध्ये काही उतारकरू झोपड्यांमध्ये राहत होते. त्यात अकोला जिल्ह्यातील डाळंबा येथील काळू रानू मांडवकर (वय 72) हा त्याच्या कुटुंबीयांसह राहत होता. 9 मे 2015 रोजी त्याची सून शांताबाई गणेश मांडवकर (वय 35) हिच्याशी पैशांवरून वाद झाला. शांताबाईची आई बयाबाई रघुनाथ शिंदे यांना 10 हजार रुपये उसनवार दिले होते. पैशाच्या मागणीवरून 9 मे रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास काळू मांडवकर याचे शांताबाईशी वाद झाले. त्याचा राग येऊन काळूने शांताबाईला डोक्यावर विट मारून फेकली. त्यानंतर विळ्याने पोटावर आणि कुर्‍हाडीने डोक्यावर वार केले. त्यानंतर काळू मांडवकर स्वत:हून पाळधी पोलिस ठाण्यात हजर होऊन सुनेवर वार केल्याचे सांगितले. जखमी अवस्थेत शांताबाईना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र 10 मे 2015 रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात काळू मांडवकर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. काळून मांडवकर हा तेव्हापासून कारागृहात होता.

पाच हजार रुपयांचा दंड
सूनेच्या हत्ये प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या काळू मांडवकर याला न्यायाधीश पटणी यांनी सोमवारी दोषी धरले होते. या खटल्यात त्यांनी मांडवकर याला कलम 302 अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच 5 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 6 महिन्याची साधी कैदेची शिक्षा न्यायाधीश पटणी यांनी सुनावली. आरोपीतर्फे अ‍ॅड. यज्ञेश पाटील यांनी कामकाज पाहिले.