सुपर-30 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण

0

पाटणा । देशातील प्रसिध्द आयआयटी प्रवेशासाठी सगळे क्लासेस विद्यार्थ्याकडून भरमसाठ फी उकळतात. परंतु बिहार राज्यातील सुपर 30मध्ये गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिकविले जाते. आता या संस्थेमधील सर्वच विद्यार्थ्यांनी आयआयटी संयुक्त प्रवेश परीक्षेत (जेईई) यश मिळवून गुणवत्ता सिध्द केली आहे.रविवारी जेईई परीक्षेचा निकाल जाहिर झाला. या निकालाबाबत सुपर- 30 चे संस्थापक व गणितज्ञ आनंद कुमार म्हणाले, की आता सुपर-30 ला अधिक व्यापक स्वरुप देण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांनीच सातत्याने प्रयत्न केल्यानेच यश मिळविल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

आनंद कुमार म्हणाले की, यशस्वी झालेले बहुतांश विद्यार्थी विद्यार्थी मजूर, अल्प-भूधारक शेतकरी कुटुंबातील असून सर्वजण 12 वी उत्तीर्ण झाले आहेत. सुपर-30 च्या विस्ताराबाबतही त्यांनी माहिती दिली. आनंद कुमार म्हणाले की, यावर्षी सुपर-30 मध्ये प्रवेशासाठी देशभरात परीक्षा घेतली जाणार आहे. याची अधिक माहिती वेबसाईटवर दिली जाणार आहे.

आनंद कुमार सुपर-30 च्या माध्यमातून मुलांची आयआयटी प्रवेश परिक्षेची तयारी करुन घेत आहेत. ही संस्था गरीब कुटुंबातील 30 मुलांची निवड करुन त्यांना मोफत शिकवणी, जेवण तसेच राहण्याची सुविधा उपलब्ध करुन देते. त्यामुळे विद्यार्थी एकाग्रपणे अभ्यासावर लक्ष केंद्रीत करू शकतात. आनंद कुमार यांनी या शैक्षणिक कार्यासाठी कोणतेही अनुदान घेतले नसल्याचा दावा केला आहे. आनंद कुमार यांच्या कामात त्यांना कुटुंबही संपुर्ण साथ देते. आनंद कुमार यांची आई सर्व 30 मुलांचा स्वंयपाक करतात, तर त्यांचे बंधू प्रणव शिकवितात. या कामामुळे आनंद यांना देश-विदेशात प्रसिध्दी मिळाली आहे.या संस्थेतून आजपर्यंत 396 विद्यार्थ्यांनी आयआयटी प्रवेश परीक्षेत यश मिळविले आहे.