सुप्रितला सलाम!

0

पत्रकारांना प्रेस्टीट्युट म्हणजे देहविक्रय करणाऱ्या वारांगणेसारखे विकले जाणारे म्हणणारे भाजपसमर्थक ट्रोलमाफिया आणि भाजपविरोधक शायनिंग राजकारण्यांच्या ‘शिखंडी’ चिथावणीने माध्यमसंस्थेला लक्ष्य करण्यासाठी साध्यासुध्या लढाऊ नेटीझन्सना वापरुन घेणारे ट्रोलसुपारीबाज यासर्वांचं थोबाड फोडणारी एक बातमी. ही बातमी छत्तीसगडमधून आली आहे. ही बातमी तशी दुखद आहे. मात्र त्या दु:खाच्या प्रसंगी ‘सुप्रित कौर’ या टीव्ही न्यूज अँकरने जे धैर्य दाखवले ते सलाम करावा असंच आहे.

सुप्रित कौर छत्तीसगड राज्यातील आयबीएस 24 या वृत्तवाहिनीची अँकर. शुक्रवारी ती नेहमीप्रमाणे बातम्या सादर करीत होती. तेवढ्यात तिला पीसीआरमधून छत्तीसगडच्या महासमंद जिल्ह्यात झालेल्या वाहन अपघाताची माहिती देण्यात आली. अँकरची परीक्षाच असते अशावेळी. कारण एक बातमी सुरु असतानाच त्यांना अचानक अशा ब्रेकिंगबद्दल पीसीआरमधील सहकारी कानातील ईपीच्या माध्यमातून कळवतो. म्हणजे एका बातमीवर लक्ष असतानाच, चेहऱ्यावर जाणवूही न देता कानात सांगण्यात येणारी दुसरी बातमी लक्षपूर्वक ऐकायची असते.

सुप्रितने बातमी ऐकली. वार्ताहराचा फोनो घेतला. त्याने आणखी काही माहिती विस्ताराने सांगीतली. रस्त्यावर एका डस्टर एसयूव्ही गाडीला समोरुन दुसऱ्या गाडीने ठोकले. डस्टरमधील पाचपैकी तीन जागीच गेले. सुप्रितने शांतपणे अपघाताची बातमी लोकांपर्यंत पोहचवली. बातमीपत्र संपवले. ती स्टुडिओबाहेर आली. तिने त्या अपघाताची पुन्हा माहिती घेतली. आणि तेव्हा मात्र ती भावना आवरु शकली नाही. ती ओक्साबोक्सी रडत कोसळलीच. कारण तसंच होतं. सुप्रितने अँकर म्हणून ज्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी दिली त्यापैकी अन्य कुणी नाही तर तिचा पतीच होता! सुप्रितने ती बातमी ऐकली, अपघातग्रस्त गाडी आणि जागा ऐकली तेव्हाच तिच्या लक्षात आलं होतं. पण जराही विचलित न होता, तिने ती बातमी लोकांसमोर सादर केली. अस्वस्थता दाखवली नाही. सलाम करावा म्हणतो ते या धैर्यालाच! आपलं जीवलग कुणीतरी जातं. तेही कायमचं. न जावं तेव्हा. न जावं अशा अवस्थेत. तरीही आपण मात्र अस्वस्थ न होता व्यावसायिक कर्तव्य बजावायचं. सोपं नसतं हे.

सुप्रितने मात्र ते करुन दाखवलं. लक्षात येऊनही ती डगमगली नाही. तिनं कर्तव्य बजावलं. तिचं कौतुक ते त्यामुळेच. अजाणेतपणी एखादी अनामिक अपघाताची बातमी चालवली असती तर ठिक आहे, पण जागा, गाडी, वेळ यामुळे जे घडलं ते आपलं जीवन बिघडवणारंच, याची माहिती असतानाही सुप्रित थांबली नाही. कोसळली नाही. त्याबद्दल तिला सलाम केलाच पाहिजे! पत्रकारिता ही अशीच पाहिजे. वैयक्तिक राग-लोभ-स्वार्थ याच्या पलिकडची. व्रतस्थनिष्टेची प्रत्येकाकडून अपेक्षा नाहीच. नसावीच. मात्र अगदी पत्रकारिता हा काहीसा वेगळा निष्ठेनं करायचा पवित्र व्यवसाय आहे, त्याचा अगदी धंदा मांडू नये. अर्थात आजही तसं करणारे कमीच. मात्र सुगंध हळुवार दरवळतो, दुर्गंध तीव्र गतीनं पसरतो.

राजकारणी हे मुळातच या जगातील कुणापेक्षाही हुषार, कमालीचे हुषार असतात. त्यांना जेव्हा एखाद्याला वापरुन घ्यायचे असते तेव्हा ते एवढ्या चलाखीने वापरुन घेतात की वापरला गेलेलाही त्यांना वापरुन घेतल्याबद्दल धन्यवाद देत असेल. आपल्याकडे जे पत्रकार ऐकत नाहीत त्यांना नको जीव करुन टाकण्याशी काही नवी नाही. जुनीच. गेल्या काही वर्षात माध्यमांच्याबाबतीत नव्याने ते अस्त्र वापरण्यास सुरुवात झाली. भाजपकडून थेट नव्हे पण त्यांच्याविचारांचे असल्याचा दावा करणाऱ्या काहींनी पद्धतशीरपणे माध्यमांना, विरोधी विचारांच्या पत्रकारांना लक्ष्य कऱण्यास सुरुवात केली. राजकारण्यांचा मानसशास्त्र चांगलंच अवगत असतं. त्यामुळे ते अनेकदा एखाद्याला प्रभावित करण्यासाठी किंवा खच्ची करण्यासाठी माइंडगेमचा वापर करतात. पत्रकारांना बदनाम कऱण्यासाठी वापरात आणलेला ‘प्रेस्टीट्युट’ हा शब्द तसाच. प्रोस्टिटयुट म्हणजे देहविक्रय करणाऱ्या वेश्या. खरंतर त्याही मजबुरीतून देहविक्रय करतात. पण त्या देह विकून पैसा मिळवतात तसे पत्रकार बातम्या विकून पैसे कमवतात, असे ट्रोलमाफियांनी चित्र उभे केले. काही पत्रकार तसे करत नाहीत असेही नाही. मात्र सरसकट आपल्या चुकीच्या धोरणांबद्दल भूमिका घेणारे, एवढेच नव्हे तर जे घडलं त्याच्या बातम्या देणारे सर्वच पत्रकार तसेच विकाऊ म्हणजे ‘प्रेस्टिट्युट’ असे भाजप समर्थक ट्रोलमाफियांनी पसरवलं. त्यांचा पेड गदारोळ एवढा प्रचंड की काही चांगले पत्रकार घाबरून नाही पण अस्वस्थ होऊन मागे सरु लागले.

एकीकडे प्रेस्टिट्युटचा गदारोळ कमी होता म्हणून की काय स्वत:ला सेक्युलरिझमचा प्रेषित मानणारा एक शायनिंग नेता पुढे सरसावला. असं म्हणतात की सरकारविरोधी आंदोलनातील त्याच्या चेहऱ्यावरील अशोभनीय ‘अदा’ एबीपी माझा या चॅनलने दाखवल्याने तो संधीची वाट पाहत होतो. एका अतिउत्साही रिपोर्टरच्या हिंदीची भ्रष्ट नक्कल करण्याच्या मोहाने त्याला ती मिळालीही. त्यातून मग त्याने हेटकॅम्पेन घडवून आणले. लढाऊ बाण्याच्या नेटिझन्सना वापरुन घेतले.

प्रतिगामी असो वा पुरोगामी, स्वतंत्र माध्यमं, निर्भिड पत्रकारिता कोणालाच नको असते. चांगलं लिहिलं तर ती चांगली पत्रकारिता, योग्य टिका केली तर मात्र ती वाईट पत्रकारिता. एवढी सरळ-सोपी समीकरणं असतात. पत्रकारितेला बदनाम केले. विश्वास संपवला. की मग आपण काहीही करायला मोकळे झालो. एवढा सोपा त्यांचा हिशेब आहे. अशा प्रवृत्तींचंच थोबाड फोडण्याचं काम सुप्रित कौरसारखे पत्रकार करत असतात. तेही ठरवून नव्हे तर आपसुकच. अपप्रवृत्तींचे पेड हेट आणि पत्रकारितेच्या प्रेमात एवढा फरक तरी असणारच ना!