रस्ते, वीजेची सुविधा नसली तरी चालेल किमान पिण्याच्या पाण्याची सुविधा करा;प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांची आर्त हाक
जळगाव – नादुरूस्त रस्ते, गटारी नाहीत, स्वच्छतेचे तर बारा वाजले आहेत. अशा कठीण परिस्थितीत रोजचा दिवस पार पाडतो आहे. पिण्याच्या पाण्यासाठी कुठलीही सुविधा नसल्याने बाराही महिने पाण्यासाठी भटकंती करावी लागते. चालण्याइतपत रस्ते नसले तरी चालेले, पथदिवे नसले तरी चालेले किमान पिण्याच्या पाण्याची सुविधा करा, अशी हार्त हाक प्रभाग 19 मधील नागरिकांनी जनशक्तिच्या माध्यमातून प्रशासनाकडे केली आहे. शहराचा एक भाग असून आम्हीही कर भरतो, मग आम्हालाच सुविधांबाबतचा वनवास कसा? या शब्दात सुप्रिम कॉलनीतील नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त करुन प्रशासनासह लोकप्रतिधींच्या कारभारावर रोष व्यक्त केला.
आम्ही करत भरतो, मग सुविधा का नाही?
प्रभाग क्रमांक 19 मध्ये सुप्रिम कॉलनी, एमआयडीसीचा काही परिसर या भागांचा समावेश आहे. जनशक्तिच्या टीमने मंगळवारी या सर्वात शेवटचा व सर्वात लहान असलेल्या या प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या प्रभागात हातावर पोट असलेले कामगार राहतात. मात्र इतर वस्तीप्रमाणे तसेच शहरवासियांप्रमाणेच हे सुध्दा नागरिक महापालिकेकडे नियमित कर भरतात. तरीही या प्रभागात काही भागात गटारी असून काही ठिकाणी गटारीच नाहीत. त्यामुळे मिळेल त्या दिशेने सांडपाणी वाहत असते. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कर भरुनही मुलभूत सुविधा मिळत नाही. इतर नव्हे पण गटारी, रस्ते तसेच वीज या सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केल्या. सुविधा द्यायच्या नसतील कर ही घेवू नका असेही नागरिकांनी सांगितले.
दूषित पाणी पिण्याची वेळ
सुप्रिम कॉलनी परिसरात दहा-दहा दिवसा आड पिण्याचे पाणी येते. त्यामुळे घरात पाणी साठवून ठेवावे लागते, दहा दिवस साठवलेल्या पाण्यात जंतू पडतात मात्र नसल्यापेक्षा बरे म्हणून जंतू असलेले पाणी पिऊन येथील नागरिकांना तहान भागवविण्याची वेळ आली असून त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहे. त्याबरोबरच गटारी नाहीत, नियमित स्वच्छता होत नाही, साफसफाई कामगार येत नाही, घंटागाडी येत नाही, कचर्या कुंड्या नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे डासांची उत्पत्ती होवून डेंग्यूचा धोका वाढला आहे.
पाणी पुरवठा योजनेचे कामही संथगतीने
पाणी येण्याच्या वेळा ठरलेल्या नाहीत. रात्री अपरात्री केव्हाही पाणी येते. तेही अनियमित पाणी पुरवठा होतो. त्यामुळे इतर ठिकाणांहून पाण्यासाठी भटकंती करावी लागते. याठिकाणी दोन वर्षापासून पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. वाघूर धरणातून पाणी याठिकाणी सम्पमध्ये आणून त्यातून जलकुंभात साठविण्यात येणार आहे. मात्र हे काम संथगतीने सुरु आहे. आम्ही चिखलाच्या रस्त्यातून, नादुरुस्त रस्त्यातून प्रवास करुन मात्र किमान पिण्याचे पाणी तर द्या अशी मागणी येथील महिलांनी केली.
22 वर्षापासून परिसराचा विकासच नाही
सुप्रिम कॉलनी परिसरांमध्ये 22 वर्षापूर्वीही त्याच समस्या होत्या व आजही त्याच समस्या आहेत. अनेक नगरसेवक आले गेले तसेच आयुक्त, अधिकारी बदलले मात्र समस्या आहे तशाच आहेत. विशेष म्हणजे हंडामोर्चा असो की इतर आंदोलन करुनही सुविधा मिळालेल्या नाही. गटारी दोन वर्षापासून साफसफाई नाही. सुविधा नसल्याने आम्ही आदिवासींप्रमाणे जीवन जगत आहेत. पथदिवे नसल्याने अंधारामुळे चिमकुल्यांना बाहेर खेळता येत नाही, सर्पदंशामुळे काही दिवसांपूर्वी दुर्घटना घडल्या आहेत. या परिसरात मुख्य प्रश्न आहेत उन्हाळ्यात प्रचंड पाणी टंचाई असते, पाणी योजनेचे कंपनीतर्फे जे काम सुरु आहे ते दोन महिन्यापासून बंद पडले आहे. ते काम पूर्ण व्हावे एवढी अपेक्षा असल्याचे नागरिकांनी सांगितले.