जळगाव : शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात रविवारी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या भिषण आगीत 14 पार्टेशनचे घर जळून खाक झाल्याची घटना घडली. आगीने एवढा रौद्ररूप धारण केला होता की घरातील सगळ्या संसापयोगी वस्तु जळून खाक झाल्या. तर रात्री चार अग्निशनमनच्या पाण्याच्या बंबाच्या सहाय्याने 2 ते 3 तीन तासानंतर आगीला आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नसून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे.
सुप्रिम कॉलनी परिसरात खेमा सुरा राठोड यांच्या नऊ पार्टेशनचे घर आहे. तर त्यांच्या शेजारीच सुरेश गोबाजी मराठे यांच्या चार तर रमेश पुना शेरावते यांचे एक पार्टेशनचे घर आहेत. दरम्यान, या पार्टेशनच्या घरांमध्ये भाडेकरू राहतात. तर या पार्टेशनच्या पहिल्या घरातच दौलत खेमा राठोड यांची लागडी पाट्यांची वखार आहे. रात्री 1.30 वाजेच्या सुमारास अचानक या वखारीला आग लागली. आगीने काही मिनीटातच रौद्र रुप धारण केल्याने वखार आगीत खाक झाली. आग लागल्याचे भाडे करूनां तसेच घरमालकांना कळताच त्यांनी घरातील बालकांना बाहेर काढले. आग लागल्याची बातमी परिसरात परिसरातील तरूण देखील आग विझविण्यासाठी धावून आले. त्यांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पार्टेशनच्या घरात राहणार्या नागरिकांनी संसापयोगी सामान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतू आगीच्या झळा बसत असल्याने त्यांना सामान देखील काढता आले नाही. मध्यरात्री 1.45 वाजता महानगरपालिकेची अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल होताच कर्मचार्यांनी पाण्याचा मारा सुरू केला. मात्र, आगीने तांडवा सुरू केला असल्याने त्यानंतर तीन अग्निमशन पाण्याचे बंब बोलविण्यात आले. सुमारे अग्निमशन कर्मचार्यांना अथक प्रयत्नानंतर पहाटे 4 वाजेच्या सुमारास आग विझविण्यात यश आले. या आगीत पार्टेशनच्या घरात राहणार्या कुटूंबियाचे संसापयोगी सामान जळून खाक झाले. कपाट, टिव्ही, पैसे, कपडे आगीत जळून राख झाल्याचे दिसून आले. घटनास्थळी एमआयडीसी पोलीस देखील दाखल झाले होते. लाखो रुपयांचे नुकसान झाले. यातच पार्टेशनच्या घरात भाड्याने राहत असलेला राजेश हा आजारी असल्याने त्याला सोमवारी रूग्णालयात नेवून त्याची तपासणी करून एक्सरे काढायचे होते परंतू आगीत संपूर्ण घरच जळून खाक झाल्याने त्यात पैसेही जळाले त्यामुळे त्याला आपले संसार उघड्यावरच मांडावा लागला आणि त्याला रूग्णालयात देखील जात आले नाही. एमआयडीसी पोलीस ठाण्यात दौलत खेमा राठोड यांच्या खबरीवरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून या आगीत त्यांचे 3 लाख 9 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमुद आहे.