नागपूरमधील विरोधी पक्षांचा मोर्चा यशस्वी झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चे वेगवेगळ्या मार्गांनी काढून नागपूरच्या टी पॉइंटवर हा मोर्चा एकत्र आला. विदर्भात काँग्रेसला चांगला जनाधार आहे. त्यामुळे मोर्चाला बर्यापैकी गर्दी होती. गेली 15 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला आंदोलनाची सवय नाही. पण हा मोर्चा काढून या दोनही पक्षांनी विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावली.पण या मोर्चात काँगे्रसने गर्दी जमवूनही क्रेडिट मात्र राष्ट्रवादीला मिळाले. या मोर्चात खासदार सुप्रिया सुळे यांचा सक्रिय सहभाग दिसला. मात्र, अजितदादा पवार मोर्चात नावालाच उपस्थित दिसले.
मी खासदार म्हणून दिल्लीचे राजकारण करणार आणि अजितदादा राज्यात पक्षाचे नेतृत्व करणार, असे सांगणार्या सुप्रिया सुळे गेल्या वर्षभरापासून राज्यात सक्रिय झाल्या आहेत. माध्यमासमोर हल्ली सुप्रिया सुळे सक्रिय झाल्याचे प्रकर्षाने जाणवते. अजितदादा यांना हळूहळू बाजूला करण्यास सुरुवात झाली आहे. 2004 पासूनच दादांना मोठे होऊ द्यायचे नाही हे पक्ष नेतृत्वाने ठरवले होते. त्यावेळी काँग्रेसपेक्षा दोन जागा जास्त येऊनही राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पदावर पाणी सोडत जास्त मंत्रिपदे पदरात पाडून घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री पद घेतले असते, तर अजितदादाच त्या पदाचे दावेदार होते. पण प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांचे कान फुंकून अजितदादांचा पत्ता व्यवस्थितपणे कापला. पटेल आणि अजितदादा असा सुप्त संघर्ष तेव्हापासून सुरू आहे. शरद पवार या पक्षाचे मालक-चालक असताना पवारांच्या पुतण्याशी संघर्ष करण्याची ताकद अशीच येत नाही. यासाठी पवारांनीच पटेलांना बळ दिले हे सर्वश्रुत आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचा गृहमंत्री असतानाच अजितदादा यांच्याविरोधी कारनामे सुरू झाले होते. याचे पुरावे अजितदादानी स्वतः पाहिले आहेत. पण मी राज ठाकरे होणार नाही, ही दादांची भूमिका आहे.
अजितदादांचा हजरजबाबी स्वभाव, प्रशासनावर असलेली पकड आणि काम करण्याची पद्धत अडचणीची ठरली आहे. यामुळेच पक्षातील आमदार अजितदादांच्या पाठीशी असतात. पवारांना आता पक्षात विश्वासू माणूस हवाय. त्यामुळेच अचानक दिलीप वळसे-पाटलांचा साठीनिमित्त कार्यक्रम करण्यात आला. सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेऊन हा सत्कार समारंभ घडवून आणला. भुजबळ तुरुंगात आहेत. अजितदादाना तुरुंगात पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. जयंत पाटील विश्वासार्ह नाहीत. त्यामुळे आपल्या माजी पीएचे नेतृत्व पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. परंतु, मंत्रीपदावर ठसा उमटवू न शकलेल्या आणि आंबेगावचा सोडून एकही कार्यकर्ता पाठीशी नसलेल्या शिष्ट वळसे-पाटील पक्ष कसा पुढे नेणार? हे पवारांनाच ठाऊक.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ तुरुंगात आहेत.18 डिसेंबरला त्यांचा जामीन होण्याची शक्यता बळावत आहे. या तुरुंगवासामुळे भुजबळ खचले आहेत. शरद पवारांना गुरू मानणारे पंतप्रधान मोदी भुजबळांच्या सुटकेसाठी मदत करू शकत नाहीत, यावर भुजबळ कुटुंबीयांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे भुजबळ पुढील निवडणूक राष्ट्रवादीकडून लढण्याची शक्यता नाही. भुजबळ यांनी 1999च्या विधानसभा निवडणुकीत एकहाती प्रचार करून राष्ट्रवादीला 58 पर्यंत पोहोचवले होते. त्यांच्या पक्षातील विरोधकांना भुजबळ यांचीच सभा हवी असे. त्यामुळे पुढील निवडणुकीत प्रचाराची मदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर असेल.नागपूरच्या मोर्चाच्या दिवशी सिंचन घोटाळ्याबाबत एफआयआरदाखल होणे, हा योगायोग नाही. सुनील तटकरे यांनी थेट अमित शहा यांना भेटून तडजोड केल्याची चर्चा आहे. अजितदादांनी मनाची पूर्ण तयारी केली आहे. त्यांची मदार आता शरद पवार यांच्यावर नसून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आहे.अटकेच्या चाव्या फडणवीस यांच्याकडे आहेत. ते अजितदादांना कितपत मदत करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. सुप्रिया पवार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्याचे शरद पवारांनी ठरवले आहे.त्यामुळेच नागपूरच्या मोर्चात सुप्रिया पवार अग्रभागी दिसल्या. यापुढेही राज्यातील आंदोलनाचे नेतृत्व त्यांच्याकडे असेल.
– नितीन सावंत
सहसंपादक, जनशक्ति
9892514124