राष्ट्रवादी आणि रासपची बारामती लोकसभा मतदार संघात जोरदार मोर्चेबांधणी
बारामती : आगामी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी, रासप, शिवसेना या पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनीही बारामती लोकसभा मतदार संघ पिंजून काढला आहे. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्याचे पशूसंवर्धनमंत्री महादेवराव जानकर यांनी त्यांना जोरदार टक्कर दिली होती. आगामी निवडणूक लढवण्याची घोषणा जानकर यांनी केल्यामुळे बारामती मतदार संघामध्ये आत्तापासूनच वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
महादेवराव जानकर यांचे संपर्कप्रमुख बापुराव सोलनकर, डॉ. अर्चना पाटील, विष्णु चव्हाण, संदीप चोपडे, या पदाधिकार्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह दुष्काळी गावांचे दौरे करून लोकांमध्ये चांगला जनसंपर्क वाढविला आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. त्यामुळे राज्यमंत्री विजय शिवतारे हेही लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे समजले आहे. मात्र बारामतीची लोकसभेची जागा रासपची असल्यामुळे महादेव यांचेच पारडे जड मानले जाते. त्यामुळे सुळे आणि जानकर, यांच्यातच पुन्हा एकदा अटीतटीची लढाई होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
काँगेस-राष्ट्रवादीची युती होईल. असे संकेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून मिळत आहेत. त्यामुळे बारामती मतदार संघामध्ये चुरस पहायला मिळणार आहे. सध्या भोर, वेल्हा, मुळशी हे मतदारसंघ काँग्रेसकडे, पुरंदरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. दौंड रासपकडे आहे.पुरंदर शिवसेनेकडे, खडकवासला भाजपकडे, काँगेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी पुरंदरची जागा काँगेसलाच मिळणार असल्याचे सांगून तयारीला वर्षभरापासूनच सुरुवात केली आहे. तर इंदापूर मतदार संघ राष्ट्रवादीकडे असल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. तरीही ही जागा काँग्रेसलाच मिळेल असे बोलले जात आहे.
इंदापूरही तापले
इंदापूर विधानसभेची जागा भाजपकडे आहे. तर राष्ट्रीय समाज पक्षाने इंदापूरच्या जागेवर दावा सांगितला असल्याने चांगलेच वातावरण तापले आहे. तसेच त्या दृष्टीने रासपनेही गावदौरे सुरू केले आहेत. या सर्व परिस्थितीवरून सध्या तरी प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे.